By  
on  

ही भोजपुरी अभिनेत्री सुबोध भावेसोबत झळकतेय मराठी सिनेमात

आपलं काम अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कित्येक मराठी कलाकार हिंदीकडे झेपावताना दिसताहेत. तसेच अनेक हिंदी कलाकारांचा सुद्धा मराठीकडे ओढा वाढला आहे.  भोजपूरी चित्रपटात नाव गाजवल्यानंतर अभिनेत्री मधु शर्मा आता ‘भयभीत’ या मराठी चित्रपटामधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. वेगवेगळ्या भाषांमधील चित्रपटांमधून काम करणाऱ्या मधु शर्मा यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता ‘भयभीत’ च्या निमित्ताने त्या मराठीत पदार्पण करणार आहेत.

‘भयभीत’ या चित्रपटात डॉक्टर काव्या ही व्यक्तिरेखा त्यांनी साकारली आहे. आपल्या या भूमिकेबद्दल सांगताना त्या सांगतात की, ‘भाषा ही कोणत्याही कलाकारासाठी बंधनकारक नसते. भाषा महत्त्वाची न मानता कलाकाराने भूमिकेकडे बघावं. मी वेगळ्या भूमिकेच्या शोधात होतेच दिग्दर्शक दिपक नायडू यांनी चित्रपटची कथा ऐकवल्यानंतर मला ती कथा भावली’. एखाद्या हॉरर चित्रपटात काम करण्याची माझी इच्छा ‘भयभीत’ च्या निमित्ताने पूर्ण झाल्याच्या त्या सांगतात. सहकलाकारांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानताना मराठीत काम केल्याचं समाधान त्या व्यक्त करतात.

अॅक्च्युल मुव्हीज प्रोडक्शन्स’ आणि ‘ब्राऊन सॅक फिल्म्स प्रा. लि’ यांची प्रस्तुती असलेला ‘भयभीत’  २८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन दिपक नायडू यांचे असून निर्मिती शंकर रोहरा ,दिपक नारायणी यांची आहे सुबोध भावे, पूर्वा गोखले,  गिरीजा जोशी,  मधू शर्मा,  मृणाल जाधव,  यतीन कार्यकर आदि कलावंत ‘भयभीत’ चित्रपटात आहेत. अविनाश रोहरा, पवन कटारिया, समीर आफताब, प्रभाकर गणगे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. कलादिग्दर्शन एकनाथ राणे तर साऊंड डिझायनर सतीश पुजारी आहेत. गीतकार मंदार चोळकर असून संगीत व पार्श्वसंगीताची जबाबदारी नकाश अझीज यांनी सांभाळली आहे. अर्जित सिंग व मीनल जैन–सिंग यांनी चित्रपटातील गीते स्वरबद्ध केली आहेत. कथा एस.ए तर पटकथा आणि संवाद दिनेश जगताप यांचे आहेत. छायांकनाची जबाबदारी वासू यांनी सांभाळली असून नृत्यदिग्दर्शन किरण गिरी यांचे आहे. अॅक्शन शकिल शैकिल यांची आहे. कार्यकारी निर्माता अनिल सिंग आहेत.

 

Recommended

PeepingMoon Exclusive