राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक सुजय डहाकेच्या आगामी ‘केसरी – saffron’ या मराठी चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा ऐकायाला मिळतेय. कुस्ती या मराठी मातीतील खेळाभोवती फिरणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच मुंबईत मोठ्या दिमाखदार सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आला. याप्रसंगी चित्रपटातील कलाकार, निर्माते आणि संपूर्ण टीम उपस्थित होती.
भावना फिल्म्स एलएलपी आणि पुणे फिल्म कंपनी प्रस्तुत ‘केसरी – saffron’ च्या ट्रेलर मध्ये एका सामान्य मुलाची संघर्षगाथा असल्याचे दिसते. चित्रपटाच्या नायकाची महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मात्र त्याने कुस्ती खेळण्यास त्याच्या वडिलांचा विरोध आहे. काही कारणांनी गावातील लोक सुद्धा त्याच्या विरोधात असल्याचे दिसते. अशा परिस्थितीत ‘मी घरात तेव्हाच पाउल टाकीन जेव्हा खांद्यावर महाराष्ट्र केसरीची गदा असेल’, असा निर्धार नायक करतो. मातीतल्या कुस्तीच्या आखाड्यात उतरायचे असेल तर आजच्या काळात पहिलवानाला महिन्याला किमान ४० – ५० हजार रुपये खर्च येतो अशा काळात सामान्य घरातील मुलगा आपल्या ध्येयापर्यंत पोहोचणार का? हे बघणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.
‘केसरी – saffron’ या चित्रपटातून मुळचा कोल्हापूरचा असलेला विराट मडके चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. तर अभिनेत महेश मांजरेकर वस्तादाच्या दमदार भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, मोहन जोशी यांच्यासह प्रविण तरडे, उमेश जगताप, छाया कदम, जयवंत वाडकर, नंदेश उमप, नचिकेत पूर्णपात्रे, सत्यप्पा मोरे, ज्ञानरत्न अहिवळे, रूपा बोरगावकर, पद्मनाभ बिंड यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
महाराष्ट्राच्या अस्सल मातीतील या चित्रपटाचे लेखन नियाज मुजावर यांनी केले असून संकलन आणि दिग्दर्शन सुजय डहाकेचे आहे. संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी गीतकार क्षितिज पटवर्धन, वैभव जोशी, संजय साठे यांच्या गीतांना स्वरबद्ध केले आहे. मोहन कन्नन, ऋचा बोन्द्रे, जयदीप वैद्य, मनीष राजगिरे यांचा सुरेल आवाज चित्रपटातील गीतांना लाभला आहे. ‘केसरी – saffron’ चे निर्माता संतोष रामचंदानी आणि सह निर्माता मनोहर रामचंदानी आहेत.
‘युद्ध जिंकायला तलवारी चांगल्या असून चालत नाही, मनगट पण तेवढीच मजबूत लागतात’ असे सांगत आपल्या शिष्याचे मनोधैर्य वाढवणारा वस्ताद, जिंकण्याच्या ध्येयाने प्रेरित झालेला नायक, पिच्छा न सोडणारा भूतकाळ व प्रतिकूल परिस्थिती या सर्व गोष्टींमुळे ‘केसरी – saffron’ बद्दलची उत्कंठा या ट्रेलर मधून अधिक ताणली जाते. मराठमोळ्या मातीतला रांगडा खेळ संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांना येत्या २८ फेब्रुवारी पासून बघायला मिळणार आहे.