देशभरात आज होळीचा उत्साह पाहायला मिळतोय. होलिका दहन करुन देशभरात होळीची पूजा-अर्चा केली जाते. पण त्यासाठी हजारो झाडांची कत्तलही करण्यात येते. मराठी-हिंदी तसेच दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील प्रसिध्द अभिनेते सयाजी शिंदे यांचं वृक्षप्रेम सर्वांनाच ठाऊक आहे. ते वेळोवेळी सर्वांना झाडं लावा, जाडे जगवाचा संदेश देताना पाहायला मिळतात.
सयाजी शिंदे नुकतेच आपल्या काही कार्यकर्त्यासमवेत पुण्यातील कात्रज घाटातून जात होते. गाडीतून त्यांना वणवा लागल्याचे दिसले. ताबडतोब त्यांनी गाडी थांबवून व आपल्या कार्यक्रत्यांना घेऊन ती आग विझवण्यास सुरुवात केली.आगीवर माती टाकून आग पूर्णपणे विझल्याची खात्री झाल्यावरच ते तिथून निघाले.
'होळीसाठी झाडं तोडू नका, ती केवळ एक अंधश्रद्धा आहे. प्रत्येकानं किमान ५ झाडं तरी लावा. झाडं ७ पिढ्या पुरतात' असं ते या वणव्यानंतर नुकतंच एका मुलाखतीत बोलत होते. अळीमिळी गुपचिळी या कार्यक्रमात सहकुटुंब हजेरी लावल्यावरही सयाजी शिंदे यांनी वुक्ष जगवण्याचा मोलाचा सल्ला सर्वांना दिला होता.
सयाजी शिंदे यांनी ‘ट्री स्टोरी’फाउंडेशनची स्थापना केली आहे. ते गेल्या अनेक वर्षांपासून वृक्ष लागवड करतायत. तसंच त्यांनी वृक्षसंमेलनसुध्दा आयोजित केलं होतं.