सध्या सगळीकडे कोरोना व्हायरसविषयी बोललं जातय. यातच यापासून स्वत:ची काळजी कशी घ्यावी याविषयीचे मेसेज पसरत आहेत. कलाकार मंडळीही सोशल मिडीयाच्या माध्यमातून काळजी घेण्याचं आवाहन करत आहेत. एकीकडे नाट्यगृह, सिनेमागृह बंद असल्याने, विविध मोठे कार्यक्रम रद्द् झाल्याने त्याच्या फटका अनेकांना बसतोय. मात्र कलाकार नागरिकांनी कशी दक्षता घ्यावी यासाठी सतर्क आहेत. नुकतच गायक महेश काळे यांनी सोशल मिडीयावर एक पोस्ट केली आहे. सध्या सगळीकडे या पोस्टची चर्चा होत आहे. कोरोना व्हायरसमुळे सॅनिटायझरचा वापर करणे, सतत हात धुणे या गोष्टींची काळजी घेण्याची गरज सध्या भासत आहे. त्यातच महेश काळे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये “गाता गाता हात धुवा आणि कोरोना घालवा” असं म्हटलय.
‘कट्यार काळजात घुसली’ सिनेमातील महेश काळे यांच्या ‘मन मंदिरा’ या प्रसिद्ध गाण्याचा या पोस्टमध्ये उल्लेख आहे. या गाण्याच्या ओळी गात 20 सेकंद तरी स्वच्छ हात धुवा असं आवाहन महेश काळे या पोस्टमधून करता दिसत आहेत. या पोस्टचा अर्थ मजेशीर असला तरी त्याचा उद्देश हा चांगलाच आहे. सगळ्यांनी या आजारापासून आपला बचाव करण्यासाठी आणि संरक्षण करण्यासाठी या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक असल्याचं इथे महेश काळे नमूद करत आहेत.