सध्या जिथे पाहावं तिथे फक्त करोना आणि करोनाच दिसतंय.संपूर्ण दैनंदिन व्यवहार या करोनामुळे कोलमडले आहेत. जगभर थैमान घालणा-या या गंभीर विषाणूचा धसका मनोरंजनविश्वानेसुध्दा घेतला आहे.
तुम्हाला माहितच असेल सिनेमा, मालिका आणि वेबशो या सर्वांचंच चित्रीकरण ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चित्रपट संघटनांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शुटिंगच्या ठिकाणी काम करणारे कलाकार, तंत्रज्ञ आणि कामगार यांना प्रवास करून कामाच्या ठिकाणी यावं लागतं. करोनाचा प्रभाव पाहता सर्वांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं कळतेय.
सोशल मिडीयावरसुध्दा करोनावरील प्रतिक्रीयांचा पाऊस पडतोय. अशातच प्रसिध्द दिग्दर्शक आणि निर्माते रवी जाधव यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. करोनामुळे सरकारने जमावबंदी लागू केली आहे. तसंच गर्दी टाळण्यासाठी सिनेमागृह, मॉल्स , जीम बंद करण्यात आले आहेत. म्हणून रवी जाधव म्हणतायत सोशल मिडीवरील गर्दीसुध्दा टाळूया.त्यांनी सोशल मिडीयाला तब्बल एका महिन्यासाठी रामराम ठोकला आहे. ते आता १६ एप्रिलला पुन्हा सोशल मिडीयावर परततीलअसं त्यांनीच खुद्द पोस्ट करत म्हटलंय.