करोनाने जगभर थैमान घातलं आहे आणि आपल्या देशातही तो आता चांगलाच पसरु लागला आहे. पण त्याला वेळीच परतवून लावण्याचं युध्दपातळीवरचं काम आपले डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्यविभागातील कर्माचारी नेटाने करतायत. या अत्यावश्यक सेवा पुरविणा-यांचं कामाला प्रोत्साहन आणि आदर म्हणून काल २२ मार्च रोजी माननीय पंतप्रधानांनी थाळीनाद आणि टाळ्या वाजवण्याचं नागरिकांना आवाहन केलं होतं.
बॉलिवूड आणि मराठीतला प्रसिध्द डिझाईनर नचिकेत बर्वेची याच करोनाच्या पार्श्वभूमीवरील जनता कर्फ्यूदरम्यान एक पोस्ट व्हायरल होत आहे. नचिकेतचे आई-बाबा दोघंही डॉक्टर आहेत. वडील राकेश बर्वे हे सर्जन आहेत तर आई बालचिकीत्सक आहे.
जनता कर्फ्यूमुळे कधीही न थांबणारी संपूर्ण मुंबई थांबली, पण आरोग्यसेवेत काम करणा-यांना याचा काहीच परिणाम नव्हता. त्यांना जाणं अनिवार्य आहे ते नेहमीप्रमाणे कामावर रुजू होते. करोनाशी दोन हात करण्यासाठी अहोरात्र झटणा-या त्यांच्या हॉस्पिटलमधील संपूर्ण स्टाफसाठी, रुग्णांसाठी व रुग्णांच्या नातेवाईकांसाठी जेवणाचा डब्बा घरुन घेऊन गेले. कारण, जनता कर्फ्यूमुळे खाण्यापिण्याची कुठलीच सोय शक्य नव्हती. त्यामुळे आपले आई-बाबा रिअल हिरो असल्याचं म्हणत नचिकेतने त्यांच्या कार्याला सलाम ठोकला आहे.
नचिकेत म्हणतो, "माझे आई-बाबा डॉक्टर, बहिण तिचा नवरा डॉक्टर हे सर्वजण न थांबता काम करतायत. रुग्णांची काळजी घेतायत. इतकंच नाही तर ते करता करता माणुसकीसुध्दा जपतायत. हीच खरी सेवा आहे. मला आठवतंय २००५ साली मुंबईत आलेला पूर, इतर बंद, दंगली आदी नैसर्गिक आपत्तींच्या वेळेससुध्दा आईनेच सर्वांना घरुन स्टाफसाठी डबे पुरवले."
फॅशन जगतात नचिकेतने स्वत:चं एक स्थान मिळवलं आहे. तानाजी द अनसंग वॉरियर, आणि डॉ. काशिनाथ घाणेकर, कट्ट्यार काळजात घुसली आदी बॉलिवूड व मराठी सिनेमांसाठी त्याने कॉस्च्युम डिझाईन केले आहेत. तो आजचा सुप्रसिध्द फॅशन डिझाईनर म्हणून ओळखला जातो.