करोनाने जगभर हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्रातसुध्दा तो आपले बस्तान बांधू पाहतोय. पण त्याला सळो की पळो करुन सोडण्याची जबाबदारी सरकारसोबतच एक सुजाण नागरिक म्हणून आपल्या सर्वांचीच आहे. करोनाविरुध्दच्या या लढाईत आता आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, जागरुक राहण्याची गरज आहे.
याच पार्श्वभूमीवर मिसेस मुख्यमंत्री म्हणजेच तुमच्या सर्वांची लाडकी सुमी अभिनेत्री अमृता धोंडगे हिने इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. आज सर्वच सेलिब्रिटी खबरदारीच्या उपाययोजनांचे, जागरुक राहण्याचे अनेक उपाय सुचवताना पाहायला मिळतायत. पण अमृताचा हा व्हिडीओ लक्षवेधी ठरतोय.
अमृता म्हणते, “करोना विषाणूने जगभरात धुमाकूळ घातलाआहे. एका कडून दुसऱ्याला आणि दुसऱ्याकडून तिसऱ्याला या विषाणूचा संसर्ग सुरुच आहे. मात्र यापेक्षा जास्त हानिकारक करोना विषयी पसरवल्या जाणाऱ्या अफवा आहेत. तुम्ही अशा प्रकारच्या कुठल्याही अफवा पसरवू नका त्यामुळे कारण यामुळे जनमानसात भिती पसरते. भिती ही विषाणूपेक्षा जास्त घातक आहे. घरीच थांबा आणि काळजी घ्या.”
महाराष्ट्रातील जनततेला हात जोडून विनंती आहे की याचं गांभीर्य ओळखा आणि सरकारच्या आवाहनला प्रतिसाद द्या. ३१ तारखेपर्यंत जमावबंदी करण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्रातील जनतेलासुध्दा सरकारला १०० टक्के सहकार्य करण्याची गरज आहे. तरच आपण हा करोनाविरुध्दचं युध्द जिंकू शकतो.