संपूर्ण महाराष्ट्रात आणि मुंबईत दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय भर पडतेय. परिस्थिती गंभीर होत चालली आहे. हे गांभिर्य जाणून घेत प्रत्येकाने आहे तिथेच घरात थांबून सुरक्षित रहावं व करोनाचा प्रादुर्भाव रोखावा. सरकारी यंत्रणांवरचा ताण कमी करावा. देशभरात पंतप्रधान मोदींनी तब्बल २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे.सर्व दैनंदिन व्यवहार ठप्प आहेत. मालिका-सिनेमे, वेबसिरीज सर्वांचीच चित्रिकरणं बंद करण्यात आली आहेत. सर्व कलाकार घरीच कुटुंबियांसोबत वेळ घालवत ाहेत.
घरी कुटुंबासोबत वेळ घालवताना आपले कलाकार नेहमीच फोटो किंवा व्हिडीओच्या माध्यमातून चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करतात. असाच एक चांगला प्रयत्न होणार सून मी ह्या घरची या गाजलेल्या मालिकेतील जान्हवीचा भाऊ पिंट्या म्हणजेच अभिनेता रोहन गुर्जर ह्याने केला आहे. रोहनदेखील ह्या लॉकडाऊन काळात घरकामात व्यस्त आहे व त्याने खास सुखी संसाराची रेसिपी एका व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केलीय. ह्यात तो पोळ्या शेकताना पाहायला मिळतोय.
रोहन ही आगळी वेगळी रेसिपी शेअर करत म्हणतो," #homequarantine मध्ये सगळेच रेसिपिज शेअर करत आहेत... म्हटलं आपण पण करावं...so Here it is... कृती: बायकोला फक्त Home Quarantine मध्येच नाही तर नेहमीच घरातल्या प्रत्येक कामात मदत करा... स्वयंपाकघरापासून ते बॅंकेच्या व्यवहारापर्यंत... आणि हे करताना आपण काहीतरी ग्रेट करतोय हा गैरसमज दूर ठेवा...संसार कसा सुखाचा होईल... ता.क. चवी पुरतं भांडण हवचं !'"
या व्हिडीओच्या माध्यमातून रोहनने खुपच चांगला संदेश सर्वांना दिला आहे.