आजघडीला अवघ्या जगाला कोरोना वायरसनं ग्रासलंय. शाळा, महाविद्यालयं, कार्यालयेच काय, अख्खी गावं अन् शहरंही टाळेबंद झालीत. अर्थात, हे सगळं अपरिहार्य आहे.
घरात बसून तरी काय करणार म्हणून लोक विरंगुळ्याचे मार्ग शोधू लागलेत. कुणी आपलं पाककौशल्य आजमावतंय, कुणी सिनेमा पाहतंय, कुणी वाचनात रमलंय, कुणी आराम तर कुणी कुटुंबीयांसोबत खेळ, गप्पा आणि मजामस्ती करतंय. ‘लॉकडाऊन एक्टिविटी’ फोटोजनी सोशल मीडियाच्या वॉल्स भरून वाहत आहेत. अशातच ज्याने देवाच्या रुपात आपल्या भक्तांसाठी धाव घेतलेल्या 'रिअल हिरोज' ना विसरून चालणार नाही.
या सगळ्यात ते कुठेच दिसत नाहीत. त्यांची प्रत्येक हालचाल कदाचित आपल्यापर्यंत पोहचतही नसेल मात्र जीवावर उदार होऊन आपल्या कुटूंबाचा विचार न करता हे डॉक्टर, नर्स, पोलीस, सहयोगी कामगार वर्ग धैर्याने मदतीला पुढे सरसावले आहेत. शब्दशः सांगायचे तर जीव तळहातावर घेऊन विपरित परिस्थितीत काम करणाऱ्या या 'रिअल हिरोज' ना सलाम ठोकत 'चेतन गरुड प्रॉडक्शन' प्रस्तुत वीणा चेतन गरुड निर्मित 'देव धावुनी आला' या गाण्याची सुंदर अशी संकल्पना चेतन रविंद्र गरुड आपल्या रसिक प्रेक्षकांसमोर घेऊन आले आहेत. कोरोना वायरससारख्या बलाढ्य शत्रूला हरवायला निधड्या छातीनं लढणाऱ्या या कर्तृत्वान स्त्री पुरुषांना एक सलामी म्हणून हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे.
'देव धावुनी आला' या गाण्याला सुप्रसिद्ध गायक केव लजयवंत वळंज याने गायले असून गीतकार राहुल काळे यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे. शिवाय या गाण्यासाठी रोहित हलदेर, सारंग रोडे, रोहित गरुड, प्रद्युमन सावंत, अभिजीत दानी अशी इतर श्रेयनामावली आहे. इंटरटेनमेंट पार्टनर म्हणून टिकटॉक ऍप्लिकेशनने या गाण्याची बाजू सांभाळली आहे. देवासारख्या धावून आलेल्या या 'रिअल हिरोज' ना सलामी देणारे हे गाणे संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित करण्यात आले आहे.