देशासमोर उभ्या असलेल्या करोनाच्या संकटाशी दोन हात करण्यासाठी सरकारी यंत्रणा युध्द पातळीवर काम करतेय. परिस्थिती भीषण होत चालली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन काळ ३ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरु राहणार आहे. आपणही एक सुजाण नागरिक म्हणून त्यांना यात संपूर्ण सहकार्य देणं अपेक्षित आहे.आपल्याला कुठलंच कठीण काम करायचं नाहीय, तर फक्त स्वत:च्याच घरात सुरक्षित राहून सरकारला सहकार्य करायचंय व यंत्रणांवरचा ताण कमी करायचा आहे.
याच पार्श्वभूमीवर सध्याच्या परिस्थितीला धैर्याने तोंड देऊन पुन्हा एकदा जोमाने काम करण्याची नवी प्रेरणा देणारं आणखी एक गाणं मराठी कलाकारांनी वर्क फ्रॉम होमच्या संकल्पनेअंतर्गत तयार करुनच सादर केलं आहे. ‘पुन्हा गरुड भरारी घेऊ..’ असं या स्फूर्तिदायक गाण्याच्या ओळी आहेत. या गाण्याची मूळ संकल्पना ही अभिनेत्री व नृत्यांगना दिपाली सय्यद हिची आहे. तर मकरंद शिंदे यांनी या गाण्याचं दिग्दर्शन केलं आहे.
जीवन मराठे, राजश्री पवार, क्रिशा चिटणीस,ऋषभ खासनीस, वैशाली मराठे आणि कविता राम यांनी या गाण्याला स्वरसाज चढवला आहे. ‘पुन्हा गरुड भरारी घेऊ..’ या गाण्यात शरद पोंक्षे, किशोरी शहाणे, वर्षा उसगांवकर, दिपाली सय्यद, मकरंद अनासपुरे, मनोज जोशी, देवदत्त नागे, स्मिता शेवाळे, मानसी नाईक, पुष्कर जोग, रेणुका शहाणे, स्मिता गोंदकर, गायत्री दातार, नितीश चव्हाण, किरण गायकवाड आदी कलाकार झळकले आहेत.