संजय दत्त आणि पूजा भट अभिनित ‘सडक’ हा 1991 प्रदर्शित झालेला महेश भट दिग्दर्शित सिनेमा सुपरहिट ठरला होता. आता या सिनेमाच्या सिक्वलद्वारे प्रसिध्द दिग्दर्शक महेश भट इंडस्ट्रीत पुनरागमन करत आहेत. निर्मिती करत असले तरी बरेच वर्ष त्यांनी दिग्दर्शन केले नव्हते. आता जवळपास तब्बल 27 वर्षानंतर ‘सडक’ सिक्वेल येतोय म्हटल्यावर बॉलिवूडसह सर्व प्रेक्षकही प्रचंड उत्सुक आहेत.
याच महेश भट यांच्या ‘सडक २’मध्ये मराठी सिनेमा, मालिका, नाटक यातून अभिनयाचा चतुरस्त्र प्रवास करणारा अभिनेता मकरंद देशपांडे याची वर्णी लागली आहे. मकरंदसोबतच ‘सडक 2’मध्ये संजय दत्त आणि पूजा भट यांच्यासह आलिया भट व आदित्य रॉय कपूरही झळकणार आहे. महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदाच आलिया आणि पूजा भट या दोघी बहिणी एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत.
डॉन अरुण गवळीची भूमिका साकारुन मकरंदने 'दगडी चाळ' या मराठी सिनेमातून रसिकांची मनं जिंकली. त्याची डॅडी ही भूमिका आणि 'चुकीला माफी नाही', हे संवांद प्रचंड गाजले. आता या सिनेमाच्या सिक्वलची ही तयारी आहे. तसंच मकरंदला हिंदी सिनेसृष्टी तशी नवी नाही. तो अनेकदा बॉलिवूड सिनेमांमध्ये झळकतो. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित आणि शाहरुख खान स्टारर 'स्वदेस' या सिनेमातील मकरंदने साकारलेली भूमिका विशेष लक्षवेधी ठरली.
सध्या मकरंद देशपांडे हा झी मराठी वाहिनीवरील 'महाराष्ट्राचा सुपरस्टार' या रिएलिटी शोमध्ये परिक्षकाची भूमिका बजावतो आहे.
दरम्यान, 'सडक' हा सिनेमा त्याकाळी प्रचंड गाजला होता. त्यामुळे ‘सडक 2’ हा प्रेक्षकांच्या पसंतीत उतरणार की नाही याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे.