देशव्यापी लॉकडाउनचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. आता हा लॉकडाऊन १७ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोनाची साखळी तोडून त्यावर नियंत्रण मिळवणे हा लॉकडाउनमागचा उद्देश आहे. पण त्यात अजूनही यश मिळवता आलेले नाही. परिस्थिती दिवसेंदिवस परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. प्रत्येकाने घरातच राहून सरकारला सहकार्य करायचंय व हे आलेलं करोना संकंट नेटाने परतवून लावायचंय. दरम्यान करोनासोबतच आर्थिक संकटालासुध्दा आता आपल्याला तोंड द्यावं लागणार आहे. हातावर पोट असलेल्या रोजंदारीवरील मजुरांचे यामुळे खुप हाल होतायत, तर तरुणांवर बेरोजगारीचं संकट घिरट्या घालतंय.
या संपूर्ण परिस्थितीवर मराठी अभिनेत्याने चिंता व्यक्त केली आहे. सोशल मीडियाद्वारे त्याने खंत व्यक्त केली आहे. परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चाललीये..... ‘हसतोय-हसवतोय, पण आतून तुटल्यासारखं वाटायला लागलंय’, अशा शब्दांत किरण माने यांनी भावना व्यक्त केल्यात.
‘परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. साताऱ्यानं पाऊणशेचा आकडा गाठलाय. हातावर पोट असलेल्यांचे काय हाल होत असतील? पॉझिटिव्ह राहायचा प्रयत्न करतोय. हसतोय-हसवतोय. पण आतून तुटल्यासारखं वाटायला लागलंय. कसोटीचा काळ या शब्दाचा खरा अर्थ आज कळतोय,’ अशी पोस्ट त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून केली आहे.