सध्याच्या निराशाजनक वातावरणात निर्माता, संगीतकार अभिजीत कवठाळकरनं घरी राहण्याचा विचार हलकाफुलक्या पद्धतीनं एका गाण्यातून मांडला आहे.नुकताच हा व्हिडीओ सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या म्युझिक व्हिडिओमध्ये श्रेयस अय्यर, धवल कुलकर्णी, वसिम जाफर, साईराज बहुतुुले, जेमिमा रॉड्रिक्स अशा प्रसिद्ध आजी-माजी क्रिकेटपटूंचा सहभाग आहे.
करोना विषाणू संसर्गाविषयी जनजागृती करण्यासाठी अनेक व्हिडिओ आजपर्यंत आले आहेत. मात्र, संगीतकार अभिजीत कवठाळकरचा म्युझिक व्हिडिओ या सर्वांत वेगळा ठरत आहे. कुटुंब, झकास, डिस्को सन्या अशा अनेक चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केलेल्या अभिजीतनं घरी राहण्याचं महत्त्व अतिशय मनोरंजक पद्धतीनं या म्युझिक व्हिडिओतून मांडलं आहे. "डोन्ट यू वरी, बस ना घरी..." असे धमाल शब्द असलेल्या गाण्याचं लेखन, संकल्पना, संगीत दिग्दर्शन अभिजीतनेच केलं असून,निर्मिती अभिजित कवठाळकर आणि डॉ. ज्योत्सना चित्रोडा यांनी केली आहे.राजेश कोलननं व्हिडिओ दिग्दर्शन केलं आहे तर म्युझिक व्हिडिओमध्ये सहभागी झालेल्या श्रेयस अय्यर, धवल कुलकर्णी, वसिम जाफर, साईराज बहुतुुले, जेमिमा रॉड्रिक्स, चंद्रकांत पंडित, सिद्धेश लाड, पारस म्हांब्रे, बलविंदरसिंग संधू, मोमा मेश्राम, राहुल त्रिपाठी, शंतनू सुगवेकर, इक्लाब सिद्दिकी, धीरज जाधव या क्रिकेटपटूंनी आपापल्या घरीच राहून चित्रीकरण केलं आहे.
करोना विषाणू संसर्गामुळे आजुबाजूला अतिशय निराशाजनक वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे नागरिकांना हसत-खेळत संदेश देण्याची गरज वाटली. आज आपल्या हाती जे काही आहे, ते करून आयुष्य छान साजरं करायला हवं. त्यासाठी अतिरेकी काळजी न करता केवळ शांतपणे घरी बसणं आवश्यक आहे. या व्हिडिओमध्ये सहभाग घेतलेले सर्व क्रिकेटपटू आपापल्या घरी राहून आपल्या फिटनेसची काळजी घेतायत. खेळाबाबत विचार करतायत. कुटुंबासह क्षण साजरे करत आहेत. अशाच पद्धतीने सर्व नागरिकांनीही अनुकरण केले पाहिजे, असं अभिजीतनं सांगितलं.