अभिनेत्री पूजा पवार हे मराठी सिनेविश्वातलं प्रसिध्द नाव. अभिनेते लक्ष्मिकांत बेर्डेंसोबत त्यांची ‘झपाटलेला’ सिनेमात ऑनस्क्रीन केमिस्ट्री चांगलीच रंगली होती. त्याशिवाय सर्जा, धडाकेबाज यांसारख्या अनेक लोकप्रिय सिनेमांमधून त्यांनी रसिकांच्या मनात घर केलं. आत्ताही त्या विविध मालिकांमधून छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येतात. पण नुकतंच पूजा पवार यांच्या नाराजीच्या चर्चांनी जोर धरलाय. आजच्या नवोदित कलाकारांना वयाने व अनुभवाने मोठ्या असलेल्या कलाकारांबाबत आदर नसल्याचं जाणवल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
काय आहे प्रकरण
पूजा पवार यांनी व्यक्त केलेल्या नाराजीच्या एक व्हिडीओबाबत माध्यमांमध्ये बरीच चर्चा सुरु आहे. तर त्याचं झालं असं, एका मालिकेत पूजा पवार आणि अभिनेता शशांक केतकरने एकत्र काम केलं होतं. त्याच्या आईची भूमिका त्यांनी साकारली होती. त्यानंतर एका नाटकादरम्यान त्यांनी त्याला पाहिलं. मात्र तेव्हा त्याने त्यांना ओळखच दाखवली नाही. या गोष्टीचं खूप वाईट वाटलं”, असं पूजा यांनी या व्हिडीओत संतापजनक आवेशात सांगितलं आहे.
पूजा पवार यांच्या या व्हिडीओनंतर शशांकनेही माफी मागितली. “माझ्याकडून असं काही घडलं असेल तर मी मनापासून माफी मागतो. मी वयाने आणि अनुभवांनी लहान आहे आणि याची मला पूर्ण कल्पना आहे. पूजा ताई नाटकाला आली होती आणि आम्ही बोललो ही होतो, असं मला तरी आठवतंय. असो.. रिस्पेक्टबद्दल बोलायचं झालं तर मी माझ्या लहानपणापासून प्रत्येकाचाच रिस्पेक्ट करत आलो आहे. जे मला ओळखतात ते माझ्या अपरोक्षसुद्धा हे नक्कीच सांगू शकतील की मी असा नाही. माझ्या नाटकाला आलेला प्रत्येक प्रेक्षक हे सांगू शकेल की प्रयोग संपल्यावर, अगदी शेवटचा प्रेक्षक भेटून बाहेर पडल्याशिवाय मी कधीच थिएटरमधून बाहेर पडत नाही.”