अभिनेता सुव्रत जोशी सध्या लंडनमध्ये आहे. सेलिब्रिटी कुठेही असले तरी सोशल मिडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी जोडलेले असतात. सुव्रत जोशीही सोशल मिडियाच्या माध्यमातून चक्क सातासमुद्रा पलीकडूनही चाहत्यांशी संवाद साधतो आहे. अनेकदा तो मजेशीर पोस्टही शेअर करत असतो. आताही त्याने सायकल प्रेमावर भली मोठी पोस्ट शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये सुव्रत म्हणतो, ‘सायकल,आज और कल.कुणाकुणाचं पहिलं वाहन सायकल होतं? आपल्या सगळ्यांचं पहिलं वाहन सायकल असेल असे मी गृहीत धरतो. ज्यांचं पहिलं वाहन वडिलांची मर्सिडीस होती ते मला फॉलो करत असतील असं वाटत नाही. किंबहुना ज्यांच्याकडे अशी मोठी गाडी असते ते आयुष्यातही कुणाला फॉलो करत नाहीत, ते ओव्हरटेक करून सतत पुढे जातात. कधी कधी फूटपाथवर झोपलेल्या माणसांवरून सुद्धा! असो. आपणही हे सायकल चालवताना कधीतरी ती फुटपाथवर चढवलेली आहे. पण सायकलवाले फूटपाथवर सायकल चढवतात त्याचे कारण भारतीय रस्त्यांवर सायकलवाल्यांना मिळणारी सप्तम श्रेणीची वागणूक. पुस्तकातील वाहतुकीच्या नियमांप्रमाणे प्रथम प्राधान्य पादचाऱ्याला आणि शेवटचे बसेस,ट्रक वगैरेंना असते. भारतात हे पुस्तक बहुतेकांनी रेअर व्ह्यू मिरर मध्ये बघून वाचलेले असावे कारण वास्तवात हा प्राधान्यक्रम बरोबर उलटा असल्यासारखे वागतात.
भारतात रस्त्यांवर सगळयात आधी बसेस आणि ट्रक, मग स्वतःच्या बापाची किंवा स्वतःला बाप समजणाऱ्या माणसाची मर्सिडीस, मग झेंडे घेऊन बाईक उडवणारे अस्मिता प्रेरित तरुण,मग कुठेही जायला नाही म्हणणारे पण रस्त्यावर मात्र कुठूनही पुढे जायला बघणारे रिक्षावाले, मग हेल्मेट सक्ती आणि सिग्नल या दोन्हीला विरोध करणारे दुचाकीवाले ,मग अमेरिकेत वाहन चालनाचे धडे घेऊन आलेले आणि कितीही संकटे आली तर उजव्या बाजूनेच गाडी चालवणारेआणि मग सायकल! याव्यतिरिक्त खड्डयांसाठी असलेली राखीव जागा...त्यामुळे सायकलच्या चाकाच्या रुंदीइतकीही जागा सायकलसाठी राहत नाही. त्यामुळे आता आपलं पहिलं वाहन सायकल रस्त्यांवर फिरवलं तर पहिल्याच दिवशी ते आपलं शेवटचं वाहन ठरण्याची शक्यता असते. सकाळी ४ वाजता उठून ४० किलोमीटर सायकल मारून त्याच्या ४ पोस्ट सोडणारे लोक वगळता आता सायकल भारतातून रद्दबादल झाली आहे.
इथे लंडन मधे मात्र सायकलवाल्याना मिळणारी वागणूक पाहुन पाय पॅडल वर असूनही मन हवेत तरंगू लागते. नेहेमी वर्गात शेवटी येणाऱ्या विद्यार्थ्याला अचानक पैकीच्या पैकी मार्क मिळाले तर कसे वाटेल तसे मला या रस्त्यांवर सायकल चालवताना वाटते.असो. येथील सायकल सफरीविषयी कधीतरी विस्तृतपणे लिहीनच. आजही बाहेर सुंदर वातावरण आहे तेव्हा आता फोन ठेवून थोडा फिरून येतो सायकलवर. ज्यांचे पाहिले वाहन सायकल आहे त्यांनी कमेंट मध्ये हात वर करा आणि सायकल चालवताना मात्र कधीही हात वर करू नका. प्रेम.’ एकंदरीतच लंडनमध्ये सायकलचा चालवण्याचा सुव्रतचा अनुभव भन्नाट दिसतोय.