अलीकडेच नऊ मोठे सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर झळकणार असल्याचं समोर आलं आहे. बॉलिवूडचे अनेक सिनेमे ओटीटीची वाट धरत असताना मराठी सिनेमा मात्र या शर्यतीमध्ये कुठेच नाही. सध्या सिनेसृष्टीमधे पंधराहून अधिक सिनेमे तयार आहेत. पण हे सिनेमे ओटीटीचा मार्ग का स्विकारत नाहीयेत हा मराठी प्रेक्षकांना पडलेला प्रश्न आहे. याउलट ओटीटीही मराठी सिनेमांबाबत तितकीशी उत्सुकता दाखवताना दिसत नाही.
ओटीटीने सर्वसमावेशक होण्यासाठी मराठी सिनेमांना मागे सारायचे ठरवलं तर नाही ना असा प्रश्न यावेळी समोर येतो. याशिवाय हिंदी सिनेमामुळे जितक्या प्रमाणात ओटीटीला प्रेक्षकवर्ग मिळेल तितक्या प्रमाणात मराठी सिनेमांना मिळणार नाही हा एक कयास बांधला जात आहे.
आगामी काळात 'जंगजौहर', 'अनन्या', 'गोष्ट एका पैठणीची', 'बस्ता' 'पांघरूण', 'मी वसंतराव', 'सरसेनापती हंबीरराव', 'दगडी चाळ २', 'दे धक्का २', 'झोलझाल', 'बळी', 'एकदा काय झालं', 'पाणी', 'मनाचे श्लोक', 'झिम्मा' हे हटके सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. त्यामुळे येत्याकाळात आशयघन मराठी सिनेमे पडद्यावर दिसतील अशी आशा करायला हरकत नाही.