By  
on  

‘भाडिपा’ आता आणणार निवडणुकांचंं धुमशान......

दासबोधात समर्थ रामदास स्वामीं म्हणतात, राजकारण बहुत करावे। परंतु कळोच नेदावे। परपीडेवरी नसावे। अंत:करण।। राजकारणाच्या डावपेचांचे जनसामान्यांना कायमच आकर्षण अन् अप्रूप असते. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणातले हे शह-काटशह लवकरच भाडिपाच्या डिजिटल मंचावर दिसणार आहेत.

जसे २०२० हे वर्ष बहुतांश लोकांसाठी गदारोळ निर्माण करणारे ठरत आहे, तसेच २०१९ मध्ये महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात चर्चित वादग्रस्त व अनपेक्षित निवडणूक पार पडली. या निवडणुकीची रोमांचित करणारी कहाणी ‘इंडिया टुडे’ ग्रुपचे उपसंपादक कमलेश सुतार यांनी ’36 Days’ या आपल्या पुस्तकातून वाचकांच्या भेटीला आणली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी पक्षांनी केलेले खटाटोप आणि राजकीय राजनीतींचे डावपेच याचा सविस्तर वृत्तांत या पुस्तकात अतिशय प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. भारतीय डिजिटल पार्टी म्हणजे ‘भाडिपा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डिजिटल कंटेट ब्रँड ने या पुस्तकाचे डिजिटल पडद्यावर रुपांतर करण्यासाठीचे हक्क मिळविले आहेत. ट्रेंडिंग मराठी युट्युब चॅनलसाठी हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट ठरेल.

 

‘महाराष्ट्रातील राजकारणी आणि नेत्यांसोबत टाऊन हॉल सिरीज #लोकमंचच्या माध्यमातून जवळून संवाद साधल्यानंतर आम्ही सर्वजण या निवडणुकीमध्ये मागे घडलेल्या रंजक प्रसंगाबद्दल खूपच उत्सुक होतो. २०१९ महाराष्ट्र विधानसभा  निवडणूक ही आपल्या पिढीने पाहिलेली सर्वात रोमांचक निवडणूक ठरली. यात  कोणीही नायक, खलनायक किंवा चांगल- वाईट असं नव्हतं. कमलेश सुतार यांच्या लेखणीतून उतरलेली, दृकश्राव्य माध्यमासाठी साजेसं असं लिखाण आणि वर्णलेल्या  लोकांची  दुटप्पी भूमिका यामुळे ’36 Days’ हे पडद्यावर आणण्यासाठी अगदी  योग्य पुस्तक आहे. आम्हाला ही कथा जशी घडली आहे तशीच सांगायची आहे यात विजय तेंडुलकरांच्या ‘सिंहासन’ सारखा ड्रामा आहे  तसेच कथा नेटफ्लिक्स वरील ‘हाऊस ऑफ कार्ड्स’ सारखी उलगडते असं सांगत हा एक वेगळा प्रयत्न आम्ही केला असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळेल, असा विश्वास ‘भाडिपा’ तसेच ‘गुलबदन टॉकीज प्रायव्हेट लिमिटेड’चे उपसंस्थापक व क्रिएटिव्ह दिग्दर्शक सारंग साठ्ये यांनी व्यक्त केला. ‘भाडिपा’ ने याआधी निर्मित केलेल्या ‘पांडू’  आणि ‘वन्स अ इयर’  या दोन्ही ‘वेब सिरीज’ प्रेक्षक तसेच समीक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. तसेच क्रिटीक्स पुरस्कारासाठी निवडलेल्या या दोन्ही ‘वेब सिरीज’ ‘मॅक्स प्लेअर’ या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.

निवडणुकीच्या ३६ दिवसात नेमकी राजकीय समीकरणे कशी बदलली याचा केवळ आढावा न घेता मनोभावनांच्या आविष्काराचे चित्रण असलेले हे ’36 Days’ हे पुस्तक आता डिजिटल नाट्यरुपात येणार असल्याचा आनंद पत्रकार कमलेश सुतार यांनी व्यक्त केला. बेस्ट सेलर ठरलेले हे पुस्तक आम्ही प्रकाशित केले याचा आनंद व्यक्त करताना याच्या डिजिटली व्हर्जनची उत्सुकता रूपा पब्लिकेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर कपिश मेहरा यांनी बोलून दाखवली.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive