मराठी सिनेसृष्टीच्या प्रसिध्द अभिनेत्री आणि दिवंगत प्रसिध्द अभिनेते लक्ष्मिकांत बेर्डे यांच्या पत्नी प्रिया बेर्डे यांनी आज ७ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. त्यांनी प्रिया बेर्डेंचं पक्षात स्वागत केलं. यावेळी प्रिया बेर्डे यांचा मुलगा अभिनेता अभिनय बेर्डे हा देखील उपस्थित होता. गेल्या काही दिवसांपासून प्रिया बेर्डे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चांनी जोर धरला होता. आज अखेर त्यांचा पक्षप्रवेश झाला.
राजकारणात प्रवेश करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच निवड करण्याबाबत प्रिया बेर्डे यांनी स्पष्ट केलं. “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कलेची जाण आहे, कलाकारांची कदर आहे. त्यांचा प्रचंड मोठा अनुभव आहे. त्यांनी कला, नाटय क्षेत्रातील अनेकांना मदतीचा हात दिला आहे” असे प्रिया बेर्डे यांनी सांगितलं. त्यांनी एका वृत्तवाहिनीला ही मुलाखत दिली.
प्रिया बेर्डे पुढे म्हणतात, "ज्यांच्यामुळे पडद्यावरचा कलाकार मोठा होतो ते पडद्यामागचे कलाकार, तंत्रज्ञ, बॅकस्टेज आर्टिस्ट यांच्यासाठी मला काहीतरी भरीव कामगिरी करण्याची इच्छा आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचा चित्रपट व सांस्कृतिक विभाग हा खुप योग्य ठरेल असं मला वाटतं. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल, म्हणूनच राष्ट्रवादीत यायचं मी ठरवलं"
” विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात प्रवेश करताय अशी चर्चा आहे, या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, “असा विचारही माझ्या डोक्यात नाही. मला तळागाळातून काम करायचं आहे. तालुका जिल्ह्यांमध्ये फिरायचं आहे. लोककलावंत, तमाशा कलावंतांचे समस्या जाणून घ्यायच्या आहेत” असे त्यांनी उत्तर दिले.