काही दिवसांपूर्वी स्पृहा जोशीने ‘शुभारंभाचा नाट्यप्रयोग तुमच्या आवडत्या नाट्यगृहात १२ जुलै रोजी’ असं कॅप्शन असलेली पोस्ट शेअर केली आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पण रसिकांना पडलेल्या प्रश्नांची उकल आता झाली आहे.अभिनेता, दिग्दर्शक हृषिकेश जोशी याच्या संकल्पनेतून आणि त्याच्याच दिग्दर्शनाखाली मराठीतील पहिलं ‘नेटक’ म्हणजे इंटरनेटवरील लाइव्ह नाटक ‘मोगरा’चा रविवारी १२ जुलै रोजी शुभारंभाचा प्रयोग होत आहे.
यात भूमिका करत असलेल्या स्पृहा जोशीने याबाबतची पोस्ट शेअर केली आहे. नेटक ‘मोगरा’चे आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रयोग होणार आहेत. अमेरिकेतील बे एरियामध्ये आणि त्याचदिवशी मुंबईमध्येही हा प्रयोग रंगणार आहेत. यामध्ये स्पृहा जोशी, वंदना गुप्ते, भार्गवी चिरमुले याशिवाय आणखी दोन अभिनेत्री आहेत. या पहिल्या वहिल्या नेटकाची नाट्यरसिकांमध्ये उत्सुकता असेल यात शंका नाही.