By  
on  

ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार १० नव्या कोऱ्या मराठी वेबसिरीज, जाणून घ्या

मराठी प्रेक्षकांच्या अविरत मनोरंजनासाठी ‘प्लॅनेट मराठी’ने ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’या नव्याकोऱ्या खास मराठी ओटीटी माध्यमाची घोषणा केली. आता त्यासाठी १० नव्या कोऱ्या वेब सिरीज आणि सुमारे ८५० तासांचे लहान मुलांसाठीचे कन्टेन्ट बनविण्यासाठी प्लॅनेट मराठीने कंबर कसली आहे. दिग्गज दिग्दर्शक आणि कलाकारांना घेऊन या १० वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. लहान मुलांसाठीचे नाविन्यपूर्ण आणि मनोरंजनाने भरपूर असं कंटेंट देखील निर्मितीच्या तयारीत आहे. येत्या नजीकच्या काळात नवीन मराठी वेब फिल्म्स, लघुपटांच्याही घोषणा करण्यात येतील. 

  ‘प्लॅनेट मराठी’चे सर्वेसर्वा निर्माते अक्षय बर्दापूरकर, अभिनेते पुष्कर श्रोत्री आणि संगीत-संयोजक आदित्य ओक यांच्या दूरदृष्टीतून साकार होत असलेल्या या मराठमोळ्या ओटीटी माध्यमाची मराठी मनोरंजनसृष्टीत चर्चा रंगू लागली आहे. ‘म मानाचा, म मराठीचा’ म्हणतं दणक्यात प्लॅनेट मराठीने प्रेक्षकांची मनं जिंकायला सुरुवात केली आहे. येत्या डिसेंबर २०२० पासून प्रेक्षकांसाठी खुल्या होणाऱ्या प्लॅनेट मराठी ओटीटीवर उपलब्ध केल्या जाणाऱ्या कंटेंटमुळे प्रेक्षकवर्ग नक्की सुखावेल अशी खात्री प्लॅनेट मराठी ओटीटीचे सीएम डी अक्षय बर्दापूरकर व्यक्त करतात.

प्लॅनेट मराठी ओटीटीचा महत्त्वाचा भाग असलेल्या डिजिटल थिएटरची घोषणाही नुकतीच अभिनेते पुष्कर श्रोत्री आणि संगीत-संयोजक आदित्य ओक यांनी केली. सिने निर्माते आणि दिग्दर्शकांनी आपले चित्रपट ऑनलाईन प्रदर्शित करावेत या अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देतं त्यांनी हा निर्णय घेतल्याचं ते सांगतात. सिने निर्मात्याला सिनेमा रिलीजचा आव्हानात्मक वाटणारा प्रवास यामुळे सुकर होणार आहे. आता घरबसल्या पे-पर-व्ह्यूच्या तंत्रावर प्रेक्षकांना चित्रपटाच्या फर्स्ट डे फर्स्ट शोचा आनंद घेता येणारं आहे. डिजिटल थिएटरमुळे निर्मात्यांच्या खिशावर कमी भार पडणार आहे. 

प्लॅनेट मराठीची पहिली निर्मिती असलेला आणि प्रदर्शित झालेला ‘एबी आणि सीडी’ चित्रपट, लवकरच येणारा शंतनू रोडे दिग्दर्शित अभिनेत्री सायली संजीवची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘गोष्ट एका पैठणीची’ हा चित्रपट तसेच प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ हा आगामी चित्रपट अशा अनेक प्रोजेक्ट्सचा चित्रपटाच्या निर्मिती पासून ते प्रदर्शनापर्यंतचा अनुभव अक्षय बर्दापूरकर यांच्या गाठीशी आहे. आणि त्यामुळेच  भविष्यात चित्रपटमाध्यमाला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता सिनेमा रिलीजच्या आव्हात्मक वाटणाऱ्या प्रवासाला एक पर्याय म्हणून निर्माते डिजिटल थिएटरचा मार्ग अवलंबवू शकतात असे ते म्हणाले.   
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive