By  
on  

Exclusive: देवळं वाढवणं नाही तर झाडं वाढवणं सदैव उपयोगाचं : अभिनेते सयाजी शिंदे

अनेक विविध भूमिका लीलया साकारणारे मराठी अभिनेते सयाजी शिंदे गेली काही वर्षं महाराष्ट्रात वृक्षसंवर्धनाबाबत जनजागृती आणि वृक्षारोपण करत आहेत. सयाजी यांचं हे काम एक लोकचळवळ म्हणून पुढे येत आहे. वृक्षरोपणासाठी सयाजी शिंदे कमालीचे आग्रही आहेत. या पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने त्यांनी पिपींगमून मराठीशी एक्सक्लुसिव्ह बातचीत केली.

वृक्ष संवर्धनासाठी तुम्ही भरीव कार्य केलं आहे. या कामामागची प्रेरणा कशी मिळते? 

सयाजी : सर्वप्रथम हे आवर्जुन सांगू इच्छितो की मला या सगळ्या कामाची मनापासून आवड आहे. पण हे सगळं करताना माझा एकच हात नाही तर अनेकांचे हात यामागे असतात. याबाबत शेखर गायकवाड (नाशिक), रघुनाथ ढोले (पुणे), धनंजय शेडवळे, लाला महाळे या आणि अशा अनेकांचे हात या ठिकाणी सतत राबत आहेत. या सगळ्यांचा कष्टाचा चेहरा व्हायचं मी ठरवलं आहे. मी फक्त दवंडी देतो खरे कलाकार तर हे आहेत. 
या उपक्रमाखाली महाराष्ट्रातील जास्तीत जास्त लोकांना एकत्र करणं हा उद्देशही आहे. विशेष म्हणजे देशी झाडं लावणं आणि संवर्धन करणं हा कामामागचा हेतू आहे. मागील सरकारच्या काही चुकीच्या धोरणांमुळे देशी वृक्षसंपदांना अव्हरेलं गेलं आहे. अनेकदा अधिका-यांकडून वृक्ष लागवडीच्या कागदोपत्री नोंदी आहेत. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन सचोटीने आता काम केलं जात आहे. मुळात या कामातील आनंद वेगळाच आहे. 

शुटिंगच्या व्यस्त वेळापत्रकामधून देवराई सारख्या कामांसाठी कसा वेळ काढता? 

सयाजी: शुटिंग ज्यावेळी सुरु नसतं त्या वेळा पाहून आम्ही कामाला सुरुवात करतो. या कामांच्या सुरुवातीच्या टप्प्यात थोडं जास्त लक्ष द्यावं लागतं. एकदा का झाडं लावली की ती मोठी होईपर्यंत अपत्यासारखी त्याची काळजी घ्यावी लागते. 

 

सध्याच्या पर्यावरणीय परिस्थितीसाठी काय सल्ला द्याल? 

सयाजी: मुळात मला असं वाटतं की पर्यावरणाच्या बाबतीत आपण इतरांना शिकवतो जास्त स्वत अवलंबतो कमी. निसर्ग नेहमी चांगलाच असेल असं नाही. पण प्रत्येकाने स्वत:च्या वयाइतकी झाडं लावली तरी लक्षणीय बदल घडेल. एखाद्या 20 वर्षं वय असलेल्या व्यक्तीने ठरवलं की तो 20 झाडं लावेल. यामुळे पर्यावरण संवर्धनाला मोलाचा हातभार लागेल. 

‘देवराई’बाबत पुढील काही योजना सांगू शकाल का? 

सयाजी: देवराई हा प्रकल्प पाच एकर पासून पाचशे एकरपर्यंत वाढवायचं. जिल्हा, तालुका अगदी ग्रामीण स्तरावर हे प्रमाण वाढवत न्यायचं आहे. झाडांना देव मानणं काळची गरज आहे. त्यामुळे देवळं वाढवण्याऐवजी झाडं वाढवा हेच माझं सांगणं असतं.

Recommended

PeepingMoon Exclusive