स्टायलिश, ग्लॅमरस लूक्ससोबत कसदार अभिनयाने रसिकांची मनं जिंकून घेणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. मराठी सिनेमात अनेक वैविध्यपुर्ण भूमिका साकारुन सईने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का सईने बॉलिवूडमधल्या अनेक सिनेमांमध्ये चाकोरीबाहेरच्या भूमिका साकारल्या आहेत.
सई आता आगामी ‘मिमी’ या बॉलिवूडपटात झळकते आहे. सरोगसीच्या विषयावर आधारलेल्या या सिनेमात सईसोबत कृती सॅनॉनही झळकणार आहे. मराठी सिनेमा ‘मला आई व्हायचंय’ यावर मिमी हा सिनेमा बेतला आहे. तिच्या यापुर्वीच्या हिंदी सिनेमांविषयी पुढीलप्रमाणे.....
लव्ह सोनिया: मानवी तस्करीवर बेतलेल्या या सिनेमात सईने अंजली ही व्यक्तिरेखा साकारली होती. देहविक्रय आणि त्यातून होणारी तस्करीवर बेतलेल्या या सिनेमाला समीक्षकांनी गौरवलं. सईने अंजलीच्या व्यक्तिरेखेसाठी वजनही वाढवलं होतं. अंजलीच्या भूमिकेसाठी तिचं कौतुक झालं नसेल तर नवलच.
हंटर: या सिनेमात सईचा बोल्ड अंदाज असला तरी भूमिकेची चुणूकही दिसून आली. या सिनेमातील सईचा किचनमधील किसिंग सीन प्रचंड गाजला होता. या हिंदी सिनेमातील तिची मराठी व्यक्तिरेखा भाव खाऊन गेली होती.
वेक अप इंडिया : या सिनेमाची चर्चा नसली तरी सईने यात मध्यवर्ती भूमिका साकारली होती. मुख्यमंत्र्यांवर बलात्काराचा आरोप केल्यानंतर स्वत:साठी उभी राहणारी मुलगी यात सईने साकारली होती.
ब्लॅक अॅण्ड व्हाईट: एका सुसाईड बाँबरवर हा सिनेमा बेतला आहे. सईने या या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केलं. या सिनेमात तिला पदार्पणातच अनिल कपूर यांच्यसोबत काम करण्याची संधी मिळाली.
गजनी : या सिनेमात तिने छोट्याश्या भूमिकेतून लक्ष वेधलं. जिया खानच्या डॉक्टर मैत्रिणीची भूमिका तिने यात साकारली होती.
लॉकडाऊन इंडिया : करोना महामारीमुळे देशावर भीषण संकट ओढवलं, करोनाच्या पहिल्या आणि दुस-या लाटेने देशात हाहाहाकार माजवला. यामुळे सरकारने देशात लॉकडाऊनची घोषणा केली. या काळात लोकांना अनेक समस्यांना सोमोरे जाण्याची वेळ आली. बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या, काही जणांवर तर उपाशी राहण्याची वेळ देखील आली. आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी हजारो किलो मीटर दुर राहणाऱ्या लोकांना तर घरी कुटुबियांकडे जाण्यासाठी पैसे आणि कुठलेही साधन नव्हते संपूर्ण शहरे बंद होती. हातावर पोट असलेल्या कामगारांची तर दुर्दशा झाली. आता याच सर्व परिस्थितीवर एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असणार आहे. प्रसिध्द बॉलिवूड दिग्दर्शक मधुर भांडारकर .’इंडिया लॉकडाऊन’ हा सिनेमा घेऊन येत आहेत. यात आपली मराठमोळी प्रसिध्द अभिनेत्री सई ताम्हणकर महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.