भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. लतादीदी 92 वर्षांच्या होत्या. करोनाची लागण झाल्याने लता दीदींवर मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात ८ जानेवारीपासून उपचार सुरु होते. या बातमीने अवघा देश शोकसागरात बुडाला आहे.त्यांच्यात करोनाची सौम्य लक्षणं आढळून आल्याने व निमोनिया झाल्यामुळे आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. अवघा देश दीदींच्या जाण्याने शोकसागरात बुडाला आहे.
दीदींच्या जाण्यानंतर त्यांच्या अनेक जुन्या मुलाखती व्हायरल होत आहेत. त्यापैकीच ही एक यात दीदी मुलाखातकाराच्या प्रश्नावर उत्तर देत म्हणाल्या होत्या, मला यापूर्वीसुध्दा हा पुर्नजन्माचा सवाल करण्यात आला होता. त्यामुळे मी पुन्हा तेच सांगेन की मला पुर्नजन्म नकोच आणि मिळाला तर लता मंगेशकर म्हणून जन्म नको. कारण लता मंगेशकर म्हणून ज्या अडचणी येतात, त्या फक्त मला माहिती आहेत. स्मितहास्य करत लतादीदींनी हे भावूक करणारं उत्तर दिलं होतं.
वडिल पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून त्यांनी गायनाचे धडे गिरवले. लतादीदी या उषा, आशा, मीना, हदयनाथ या सर्व भावंडात मोठ्या आहेत. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांनी आपल्या भावंडांची काळजी घेण्यापासून त्यांच्यावर गायनाचे संस्कार केले. त्यांनी असंख्य गाणी आजपर्यंत गायली आहेत. तसंच विविध प्रादेशिक भाषांमध्येसुध्दा त्यांनी आपल्या सूरांची जादू दाखवली.