Birthday Special: शतकाच्या महानायकाचं मराठी सिनेमाशी असेही ऋणानुबंध

By  
on  

अदाकारीचा जादुगार अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस. खरं तर अमिताभ आणि त्याच्या सिनेमांविषयी बोलण्या आणि लिहिण्यासाठी शब्द मर्यादेचं भान राहिलं नाही तर नवलच. अमिताभ वयाच्या प्रत्येक टप्प्यावर नव्याने भेटला आहे. आपलासा वाटला आहे. त्याने आतापर्यंत साकारलेल्या व्यक्तिरेखा मनाला स्पर्शणा-या आहेत. त्यामुळेच लाडक्या नायकांच्या यादीत त्याची जागा कायमच वर राहिली आहे.

आनंदमधील धीरगंभीर डॉक्टर असो, दो और दो पांचमधील विनोदी शिक्षक असो, अभिमानमधील अहंकारी कलाकार असो किंवा गुन्हेगारी जगतातील डॉन असो. अमिताभ या प्रत्येक व्यक्तिरेखेत आपल्याला भावला आहे. अमिताभची पहिली इनिंग जितकी चमकदार होती, तितकी दुसरी इनिंगही दमदार आहे. वय हा केवळ आकडा असतो हे त्याने शब्दश: सिद्ध केलं आहे. अमिताभ हे नाव केवळ हिंदी सिनेमांपुरतंच मर्यादित राहिलं नाही. मराठी सिनेमातही त्याची जादू चालली आहे.

बिग बींचा मराठी सिनेमांशी सर्वप्रथम संबंध आला तो ‘आक्का’ सिनेमाच्या निमित्ताने. 1994 मधील या सिनेमात अमिताभने पाहुण्या कलाकाराची भूमिका त्यांनी साकारली होती. अमिताभ यांना मुंबई म्हणजेच त्याच्या कर्मभूमीबद्दल आदर आहे. त्याचप्रमाणे मराठीबाबतही आहे. खुप कमी लोकांना माहिती आहे की अमिताभ यांनी  ‘श्वास’ सिनेमाची ऑस्करसाठी निवड झाल्याबद्दल निर्मात्यांना एक लाख रुपयाचं बक्षीस दिलं होतं. हा निधी सिनेमाच्या प्रमोशनसाठी वापरला गेला होता. याशिवाय ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी या सिनेमाला भारताकडून ऑस्करला पाठवण्यात यावा यासाठी अमिताभ यांनी प्रयत्न केले होते. अमिताभचं मराठीप्रेम इतक्या पुरतंच मर्यादित नाही. अमिताभची कंपनी AB Corp. ने ‘विहिर’ या मराठी सिनेमाची निर्मितीही केली आहे.

अमिताभ यांनी अनेकदा मराठी सिनेमांची आशयघनता आवडत असल्याचंही अमिताभने अनेकदा बोलून दाखवलं आहे. आता तर तो मराठी सिनेमातही दिसणार आहे. प्लॅनेट मराठी आणि अक्षय बर्दापूरकर निर्मित आणि मिलिंद लेले दिग्दर्शित ‘AB आणि CD’ या आगामी मराठी सिनेमात तो दिसणार आहे. त्याच्यासोबत या सिनेमात विक्रम गोखले, सुबोध भावे, सायली संजीव आणि अक्षय टंकसाळे हे कलाकार आहेत. बिग बींना ‘पीपिंगमून मराठी’कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.....

Recommended

Loading...
Share