सोनी मराठीवर कोण होणार करोडपतीचे नवे पर्व लवकरच सुरु होणार आहे. जसजसे हे पर्व सुरु होणार तशी प्रेक्षकांच्या मनात या पर्वाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मराठीमधलं आघाडीचं नाव नागराज मंजुळे हे पर्व होस्ट करणार आहे. वाहिनीवर दिसणाऱ्या टीजर्स आणि टायटल सॉंगमधून या शोचं आकर्षक स्वरूप दिसत असल्याने कोण होणार करोडपतीला लोकांनी प्रदर्शनाआधीच डोक्यावर घेतले आहे. त्यातच सोनी मराठीने शोचं प्रमोशन करायची आजवर कधीही न आजमावली गेलेली अशी हटके शक्कल काढली आहे.
आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच कोण होणार करोडपतीची 'हॉटसीट’ स्टुडिओमधून बाहेर पडून चक्क आता वेगवेगळ्या शहरांतून फिरणार आहे. हॉटसीटवर पोहोचण्यासाठी लोकांना अनेक ऑडीशन, अनेक फेऱ्या यांना मेहनतीने पार करून 'फास्टेस्ट फिंगर फर्स्ट’ पोहोचावे लागते आणि त्यानंतरही त्यामध्ये पहिला क्रमांक जो पटकवेल तोच भाग्यवान हॉटसीटवर कोण होणार करोडपतीचा खेळ खेळू शकतो. पण या प्रमोशनमुळे आता प्रत्यक्ष हॉटसीटच लोकांच्या दारी येणार आहे. तसेच नागराज मंजुळेचा व्हर्चुअल अवतार देखील असेल. त्यामुळे लोकं ही हॉटसीटवर बसू शकतात, सेल्फी काढू शकतात आणि इतकेच नव्हे तर कोण होणार करोडपतीचा व्हर्चुअल गेमप्ले देखील खेळू शकतात. त्याचबरोबर ज्यांना कोण होणार करोडपतीमध्ये प्रत्यक्ष हॉटसीटवर बसायची संधी मिळाली नाही त्यांना या प्रमोशनमुळे या शोचा खराखुरा अनुभव घ्यायची ही सुवर्णसंधी मिळणार आहे.
१३ ते १७ मे दरम्यान ही हॉटसीट मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी अवतरणार आहे. १३ मे रोजी ही हॉटसीट बोरीवली, विरार, नालासोपारा येथे फिरणार असून, १४ मे रोजी ठाणे तलावपाळी, कल्याण-डोंबिवली परिसरात हॉटसीटसोबत सेल्फी काढता येईल. १५ मे रोजी गोरेगाव, विले पार्ले येथील बुद्धिवंत हॉटसीटवरून प्रश्नाला भिडतील. १६ तारखेला या सिंहासनावर दादर, सिद्धिविनायक, वरळी नाका येथील राजे विराजमान होतील. आणि १७ तारखेला तुम्ही करी रोड व गिरगाव येथे हॉटसीटवर आरूढ होऊ शकता. या ठिकाणी जाऊन 'कोण होणार करोडपती'चा एक डाव खेळता येईल. सोनी मराठीने उपलब्ध करून दिलेली ही एक अभूतपूर्व संधी आहे.