'देवमाणूस' मालिकेत हा अभिनेता दिसणार महत्वपूर्ण भूमिकेत

By  
on  

'देवमाणूस' या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आणि या मालिकेच्या अफाट लोकप्रियतेमुळेच या मालिकेचं दुसरं पर्व देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस आलं. या पर्वाने देखील प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. नुकतंच मालिकेत अजित आणि डिम्पल यांचा लग्नसोहळा दाखवण्यात आला होता.

पहिल्या पर्वात अजितला पोलीस इन्स्पेक्टर दिव्या सिंग लग्नाच्या मंडपातून खेचून पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाते. या पर्वात अजितला कोणाचाच  धाक नाही असं वाटतं असतानाच लवकरच प्रेक्षकांना मालिकेत एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, कारण मालिकेत मार्तंड जामकर यांची एन्ट्री होणार आहे.

हा मार्तंड जामकर म्हणजे अभिनेते मिलिंद शिंदे या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येतील. आपल्या उत्तम अभिनय कौशल्याने मिलिंद शिंदे यांनी आपल्या अभिनयाची एक वेगळी छाप निर्माण केली आहे. त्यामुळे आता देवमाणूस या मालिकेत एका रंजक वळणावर मिलिंद शिंदेची मार्तंड जामकर ही भूमिका मालिकेत काय ट्विस्ट घेऊन येते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मार्तंड जामकारमुळे अजितकुमारसमोर कुठलं नवीन आव्हान उभं राहणार? अजितकुमारचा चांगुलपणाचा मुखवटा फाडून त्याचा खरा चेहरा गावकऱ्यांसमोर येईल का? हे लवकरच या मालिकेतून समोर येईल.

या भूमिकेबद्दल बोलताना मिलिंद शिंदे सांगतात की, "देवमाणूस ही मालिका खूपच लोकप्रिय आहे आणि या मालिकेतील अजितकुमारची व्यक्तिरेखा खूप दमदार आहे. या पर्वात मार्तंड जामकर ही महत्वपूर्ण भूमिका मी साकारतोय याचा मला खूप आनंद आहे. याआधी देखील प्रेक्षकांनी माझ्या सर्व भूमिकांना डोक्यावर उचलून धरलं त्यामुळे हि भूमिका देखील त्यांच्या लक्षात राहील आणि त्यांना आवडेल अशी मला खात्री आहे. अजितकुमार आणि मार्तंड यांची जुगलबंदी प्रेक्षकांना लवकरच बघायला मिळेल."

Recommended

Loading...
Share