कोरोनाग्रस्त परिस्थितीत लॉकडाउनमुळे मनोरंजन विश्वातील चित्रीकरण बंद करण्यात आलं होतं. आता विविध अटी नियमांसह चित्रीकरण सुरु करण्यास परवानगी मिळाल्यानंतर आता मालिकांच्या चित्रीकरणाला हळूहळू सुरुवात होताना दिसत आहे. झी मराठी वाहिनीवरी ‘माझा होशील ना’ या प्रसिद्ध मालिकेच्या चित्रीकरणालाही नुकतीच सुरुवात झाली आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत होता. आणि त्यानंतर लॉकडाउनमुळे या मालिकेचे नवे भाग प्रेक्षकांना पाहायला मिळाले नाहीत. मात्र आता चित्रीकरणाला सुरुवात झाल्याने या मालिकेचे नवे भाग प्रेक्षकांसमोर येतील.
काही दिवसांपूर्वीच या मालिकेतील प्रमुख कलाकार पुण्याहून पुन्हा मुंबईत आले. प्रेक्षकांप्रमाणेच हे कलाकार देखील गेल्या अनेक दिवसांपासून याची आतुरतेनं वाट पाहत होते.
याविषयी बोलताना अभिनेत्री गौतमी देशपांडे म्हणाली, "मुंबईत आल्यानंतर जवळपास १५ दिवस मी क्वारंटाईन होते. या दिवसात मी माझ्या भूमिकेच्या अभ्यासावर अधिकाधिक भर दिला. येत्या काळात मालिकेत काय बदल होतील किंवा शूटिंगसाठी स्वतःला तयार करण्यासाठी माझी घरच्याघरी तालीम सुरु होती. करोनामुळे पुढचे अजून काही दिवस स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. तेच नियम पाळून शूटिंग करावं लागेल. या गोष्टीला खूप घाबरून न जाता, सकारात्मकतेनं मी याला सामोरं जाऊन काम करण्याचं ठरवलं आहे. शिवाय, खूप दिवसांनंतर काम करण्याचा वेगळाच उत्साह असेल. त्यामुळे शूटिंग सुरू झाल्यानंतरही आम्ही सर्वतोपरी काळजी घेऊन पूर्वीसारखीच मजा करत आमचं काम करणार आहोत. निर्माते-दिग्दर्शक त्यांच्या परीनं सगळी खबरदारी घेतीलच. परंतु, मीही स्वतःची योग्य ती काळजी घेईन. शिवाय, सर्व सरकारी नियमांचं मी पालन करणार आहे."
अभिनेता विराजस कुलकर्णी आणि गौतमी देशपांडे या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत.तेव्हा हे कलाकार दिलेल्या नियमांचं पालन करून चित्रीकरण करत आहेत. बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा चित्रीकरणाला सुरुवात झाल्याचा आनंदही या मालिकेच्या टीमला झाला असेल असं म्हणणं वावगं ठरणार नाही.