लॉकडाउनमुळे मनोरंजन विश्वाचं चित्रीकरण बंद करण्यात आलं होतं. मात्र सरकारच्या परवानगी आणि नियमांसह काही चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. ‘माझा होशील ना’ या मालिकेच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली आहे. या मालिकेच्या सेटवर तीन महिन्यानंतर पोहोचल्यानतंर मालिकेतील कलाकार अभिनेता विराजस कुलकर्णीला मालिकेच्या सेटवरील पहिल्या दिवसाची आठवण झाली आहे. जेव्हा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत होती तेव्हा सेटवरील पहिल्या दिवसाचा फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करत त्याने ही खास आठवण शेयर केली आहे. तो लिहीतो की, “हा फेब्रुवारीत शुटच्या पहिल्या दिवसाचा थ्रोबॅक आहे. आम्ही माझा होशील नाचं पहिल्यांदा नॅरेशन ऐकत होतो. आमच्या भूमिका कशा असतील याचा शोध घेत होतो. कोरोनानंतर पुन्हा सेटवरच्या पहिल्या दिवशी हा पोस्ट करणं योग्य वाटलं. कारण भावना त्याच आहेत. पण आता तुम्हा सगळ्यांचं प्रेम आणि सहकार्य लाभलय.”
लॉकडाउनमध्ये बऱ्याच मालिकांचे जुने भाग आणि जुन्या मालिका पाहायला मिळत होत्या. मात्र लवकरच या मालिकेचे नवे भाग प्रेक्षकांना टेलिव्हिजनवर पाहायला मिळतील.