'सुख म्हणजे नक्की काय असतं' तील जयदीप म्हणजेच मंदार जाधवच्या भावाची 'रंग माझा वेगळा' मालिकेत एन्ट्री

By  
on  

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका रंग माझा वेगळामध्ये लीप आला असून मालिकेचं कथानक १४ वर्षांनी पुढे सरकलं आहे. या १४ वर्षात बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. साक्षीच्या न केलेल्या खुनाच्या आरोपाखाली कार्तिक १४ वर्षांचा तुरुंगवास भोगून आलाय. तर दीपिका कार्तिकीही आता मोठ्या झाल्या आहेत. लवकरच मालिकेत दीपिका कार्तिकीचा खास मित्र आर्यनची एन्ट्री होणार आहे. अभिनेता मंदार जाधव चा भाऊ मेघन जाधव आर्यन ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. 

या मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना मेघन म्हणाला, ' मी हिंदी मध्ये बरंच काम केलं आहे. पण माझ्या करियरची सुरुवात मराठी सिनेमानेच झालीय. रंग माझा वेगळा ही  माझी मराठीतील पहिली मालिका आहे. आर्यन ही व्यक्तिरेखा साकारतो आहे. या भूमिकेला दोन शेड्स आहेत. तो मनाने चांगला आहे मात्र तो एका मिशनवर आला आहे. आर्यन कुणाच्या सांगण्यावरून हे करतोय हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल. माझा भाऊ मंदार जाधव माझ्या या नव्या प्रोजेक्टसाठी खुपच उत्सुक आहे. स्टार प्रवाहसोबत मी काम करावं अशी त्याची इच्छा होती जी आता पूर्ण होतेय.

गेल्या काही वर्षात स्टार प्रवाहने ज्या पद्धतीने दर्जेदार मालिका सादर करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे ते वाखाणण्याजोगं आहे. त्यामुळे या प्रवाहात सामील होताना अत्यानंद होत आहे. तेव्हा पाहायला विसरू नका रंग माझा वेगळा सोमवार ते शनिवार रात्री ८.०० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Recommended

Loading...
Share