By  
on  

Webseries Review: पाहा! नवरा-बायकोच्या हलक्या-फुलक्या नात्यामधील गंमत 'आणि काय हवं...?'

आणि काय हवं...?

दिग्दर्शन: वरुण नार्वेकर 

कलाकार: उमेश कामत, प्रिया बापट

कुठे पाहाल: MX प्लेयर 

नवरा-बायकोचं नातं हे आंबटगोड असतं. कधीकधी त्यात सुखद क्षणांचा सहभाग असतो तर कधीकधी त्यात मस्त भांडणाचा तडका लागतो. काहीही झालं तरी एकमेकांचा सहवास त्यांना हवाहवासा असतो. आणि याच सहवासातून त्यांच्यामधलं प्रेम बहरत जातं. वरुण नार्वेकर दिग्दर्शित 'आणि काय हवं...?' या वेबसिरीजमध्ये अशाच एका तरुण नवरा-बायकोची प्रेमळ गोष्ट पाहायला मिळते. साकेत आणि जुई हे आजच्या काळातील जोडप्याचं प्रतिनिधीत्व करतात. ही अनोखी गोष्ट बघताना आपल्याही चेह-यावर आपसुकच एक हसु तरळुन जातं

कथानक:

ही गोष्ट आहे साकेत आणि जुईची. लग्नाला दोन वर्ष झालेलं एक क्युट कपल. जुई स्पष्टवक्ती आणि हुशार बायको. तर साकेत हा काहीसा वेंधळा तरीही तितकाच प्रेमळ नवरा. दोघांनी नुकतंच नवं घर घेतलं असतं. घर लावण्यापासुन ते पहिली गाडी घेण्यापर्यंत तसेच लग्नाआधीच्या आपल्या भानगडींबद्दल हे दोघेही मनमोकळ्या गप्पा मारताना सहजच दिसतात. त्यानंतर पुढे या दोघांच्या लव्हेबल संसारातल्या इवल्याश्या आणि प्रेमळ गोष्टींनी सजलेली ही वेबसिरीज म्हणजे 'आणि काय हवं...?'. एकुण सहा भागांची असलेली ही वेबसिरीज इतकी रंजक बनवली की, सहा भाग लगेच संपल्यावर 'अजुन थोडे भाग हवे होते', ही चुटपुट लागुन राहते. हेच या वेबसिरीजचं यश आहे.

दिग्दर्शन:
'मुरांबा' या मराठी सिनेमाचे दिग्दर्शक वरुण नार्वेकर यांनी ही वेबसिरीज दिग्दर्शित केली आहे. साकेत-जुईच्या सुखी संसारातले इवलेसे क्षण त्यांनी अचुकपणे प्रेक्षकांपर्यंत पोहचवले आहेत. मुळात नवरा-बायकोची गोष्ट जरी असली तरी त्यांनी भांडणाला मुळीच स्थान दिलं नाही. सुरुवातीपासुन शेवटपर्यंत ही वेबसिरीज त्यांनी हॅपनिंग मोडवर ठेवली आहे. प्रत्येक भागातली छोटीशी गोष्ट त्यांनी हलकीफुलकी सजवली आहे. 

अभिनय:
उमेश कामत आणि प्रिया बापट यांनी साकेत-जुईच्या भुमिकेत कमाल उठुन दिसत आहेत. साकेतचा वेंधळा आणि जुईला छळण्याचा काहीसा मिश्किल व अवखळ स्वभाव उमेश कामतने जबरदस्त साकारला आहे. 'नवरा असावा तर असा!' अशा आदर्श नव-याच्या भुमिकेत उमेश पाहायला मिळतोना उमेशला पाहायला मिळतो. जुई या हुशार आणि कर्तव्यदक्ष पत्नीच्या भुमिकेत प्रिया बापट सहजसुंदर वावरली आहे. स्पष्टवक्ती, आत्मविश्वासपुर्ण अशा जुईच्या भुमिकेतले विविध पदर प्रियाने या वेबसिरीजमध्ये उलगडले आहेत. ऑफस्क्रीन जीवनसाथी असलेले उमेश-प्रिया या जोडीने या वेबसिरीजमधुन आपल्या अभिनयाची जादु पुन्हा एकदा दाखवुन दिली मग 'आणि काय हवं...?' 

वेबसिरीज का पाहावी?
एम एक्स प्लेयरची ही पहिली मराठी वेबसिरीज आहे. उमेश-प्रिया हे दोघं तब्बल सात वर्षांनी या नव्या माध्यमातुन एकत्र आले आहेत. सहा भागांचीच ही वेबसिरीज असल्याने तुम्ही येता-जाता प्रवासात किंवा फावल्या वेळेत आस्वाद घेऊ शकता. साकेत-जुईची ही गोष्ट पाहुन तुम्ही नक्कीच रिफ्रेश व्हाल, यात शंका नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive