‘इडियट बॉक्स’ ही नवी मराठी वेबसिरीज एम एक्स प्लेयरवर नुकतीच प्रदर्शित झाली आहे. विराजस कुलकर्णी आणि जीत अशोक यांनी दिग्दर्शीत केलेल्या या वेब सिरीजमध्ये अभिनेत्री आणि विराजसची आई मृणाल कुलकर्णी यांचाही सरप्राईज रोल यात पाहायला मिळतोय. ज्याची छोटीशी झलक ट्रेलरमध्येही पाहायला मिळाली. मात्र त्यांचं हे रुप पाहून सगळ्यांना सोनपरीची आठवण झाली. मात्र ही भूमिका नेमकी काय आहे त्यासाठी ही सिरीज पाहावी लागेल. पिपींगमून मराठीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत मृणाल यांनी या सिरीजमध्ये काम करण्याचा अनुभव शेयर केला आहे.
त्या म्हणतात की, “ही कॉन्सेप्ट ऐकून मी उत्सुक होते. पण ही लव्ह स्टोरी वेगवेगळ्या प्रत्येक एपिसोडला वेगळा जॉनर घेऊन येते. त्यामुळे मी लगेच याकडे आकर्षित झाले. आधी मी याचा भाग नव्हते मात्र जेव्हा गाणी ऐकली तेव्हा माझ्यासाठी यात रोल नाही का असं विराजसला विचारलं. मला खूप कुतूहल होतं या सिरीजचं आणि मला याचा भाग होऊन खूप मस्त वाटलं.”
आई-मुलाची ही जोडी आता त्यांच्या प्रोफेशनमध्येही एकत्र दिसू लागली आहे. मात्र मृणाल यांनी त्यांची एक इच्छाही यावेळी सांगीतली. त्या सांगतात की, “ आम्ही आई आणि मुलगा असलो याची गंमत असली तरी याची बंधनं सुद्धा खूप असतात. तो मला कधी सेटवरही येऊ देत नाही. जर मी प्रोजेक्टचा भाग असेल तरच जाऊ शकते. किंवा प्रोजेक्टचा प्रोडक्ट तयार झाला की मला दाखवला जातो. त्यामुळे ती गंमत आहेच. पण मला खूप आनंद झाला. माझं तर आयुष्याचं स्वप्न आहे की एक अख्खी फिचर फिल्म त्याच्याबरोबर करावी, आणि त्याने मला डिरेक्ट कराव. ही तर अजून सुरुवात आहे.”
मात्र या सिरीजमधील भूमिकेविषयी कोणतही सरप्राईज सध्या त्यांनी रिव्हील केलं नाही. त्या म्हणतात की, “मी सध्या याविषयी सांगणार नाही. पण ही यंगस्टर्स आहेत सगळी. आणि त्यांच्यासोबत राहून मला मजा आली. हेच सध्या सांगू शकते. शिवराज आणि शिवानी यांची लव्हस्टोरी कशी घडत जाते हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. आणि माझा यातला पार्ट आहे तो सरप्राईज आहे.”
तेव्हा या सिरीजमध्ये मृणाल कुलकर्णी पुन्हा सोनपरी बनल्या आहेत की नाही या साठी ही वेबसिरीज पाहावी लागेल.