Lockdown : आई ,तुम्ही आणि हे मराठी सिनेमे झाला ना MothersDay चा हा फक्कड बेत!

By  
on  

आईबद्दल आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी खरंतर कुठल्याही एका दिवसाची गरज नाही. ते तर आपण सतत तिच्यावर प्रेम करतो. जिने आपल्याला या जगात आणलं, आपली काळजी घेतली, शिकवलं, घडवलं... तिच्यासाठी एकच दिवस का.... पण तरीही एक तिचा सन्मानासाठी मे महिन्याच्या दुस-या रविवारी 'मदर्स डे' म्हणून सेलिब्रेट करतात. 

प्रत्येकाने या दिवशी आपल्या आईच्या आनंदासाठी हा दिवस राखून ठेवला पाहिजे. धकाधकीच्या आयुष्यात खरतंर आईला आपण वेळ देणं हीच एक अमूल्य भेट असते. सध्या करोना संकटामुळे लॉकडाऊन जाहीर झाला आहे व आपण सर्व घरीच आहोत. त्यामुळे 'मदर्स डे' हा आईसाठी अविस्मरणीय करण्याची तुम्हाला छान संधी  आहे. मस्त आईसाठी काहीतरी खायला बनवा व आईसोबत हे स्पेशल मराठी सिनेमे पाहून हा दिवस सेलिब्रेट करा. 

 

मदर्स डे सेलिब्रेट करण्यासाठी आईसोबत एन्जॉय करा हे स्पेशल मराठी सिनेमे 

 

 

 
नाळ 

आई व मुलाच्या नातेसंबधावर हा सिनेमा भाष्य करतो. हळूवार-अलगद या सिनेमाची कथा फुलत जाते. जेव्हा लहानपणापासून आपली काळजी घेणारी, सतत आपल्याच मागे असणारी आईही आपली खरी आई नाही हे जेव्हा चैत्याला समजतं तेव्हा तो कसा सैरभर होतो व त्याच्या वागणुकीत कसा फरक पडतो याची ही खुमासदार गोष्ट आहे. अभिनेते दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासह देविका दफ्तरदार हिने आईची भूमिका सिनेमात साकरलीय. तर बालकलाकार श्रीनिवास पोकळेने गोड-लाघवी चैत्या साकरला आहे. या सिनेमासाठी श्रीनिवासला राष्ट्रीय पुस्काराने गौरविण्यात आलं होतं. 

 

हिरकणी 

घरी एकट्या असलेल्या आपल्या बाळाला भेटण्यासाठी व्याकूळ झालेल्या आईची ही कथा आपण सर्वांनीच पाठ्यपुस्तकात अनुभवली आहे . शिवाजी महाराजांच्या आदेशामुळे सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे बंद झाल्यावर बाळाला भेटण्यासाठी काळोखात गडाचा खडतर प्रवास करुन खाली उतरणा-या  हिरकणीची ही शौर्यागाथा आहे . महाराजच मग या कड्याला हिरकणी कडा नाव देऊन तिचा साडी-चोळी देऊन सन्मान करतात. प्रसाद ओक दिग्दर्शित या सिनेमात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने हिरकणी साकारली. अवघ्या महाराष्ट्रची मनं या सिनेमाने जिंकली. 

 

 

बकेट लिस्ट 

सुप्त इच्छांचा हा सिनेमा प्रवास पडद्यावर पाहणं एक मनोरंजन ट्रीटच आहे. त्यात माधुरी दीक्षितसारखी बॉलिवूडची धकधक गर्ल हिचा मराठी पदार्पणातील हा सिनेमा म्हणजे सोने पे सुहागा. चाळीस वर्षे चाकोरीबद्धतेने जगणाऱ्या गृहिणीच्या आयुष्यात २० वर्षांपूर्वीचं आयुष्य हे अपघाताने डोकावतं. माधुरीच्या वयानुरुप तिला साजेसीच अशीच ही व्यक्तिरेखा आहे.  माधुरी दीक्षितसह या सिनेमात सुमीत राघवन, वंदना गुप्ते, प्रदीप वेलणकर, इला भाटे, दिलीप प्रभावळकर यांसारख्या मातब्बर कलाकारांची भलीमोठी फौज आहे. 

 

आम्ही दोघी 

ही कथा आहे एका सावत्र मायलेकींची. लहानपणीच आई गेलेल्या मुलीच्या मनातल्या भावनांचा होणारा उद्रेक व सावत्र आईसोबतची तिची वागणूक यात पाहायला मिळते. वडिलांपेक्षा खूप कमी वयाच्या आईसोबत तिचे हळुहळू मैत्रीचे बंध निर्माण होतात. सावत्र आई व तिची मुलगी  या दोन्ही व्यक्तिरेखा अनुक्रमे मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट यांनी साकारल्या आहेत. त्यामुळे आजच्या पिढीला थोडा विचार करायला लावणारा आम्ही दोघी  हा सिनेमा आहे. 

 

 

मला आई व्हायचंय 

या सिनेमाची कथा ही सरोगेट मदरभोवती गुंफण्यात आली आहे. आई ही आईच असते. मग ती सरोगेट असली तरी तिच्या भावना बदलत नाहीत. तिचं प्रेम आटत नाही. सरोगेट आई आणि मुलावर आधारित भारतातला पहिला सिनेमा अशी ओळख असलेला मला 'मला आई व्हायचंय'ने अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली. या सिनेमाची कथा, दिग्दर्शन, निर्मिती, संवांद आणि गीतलेखन अशी सर्वच धुरा अॅड. समृध्दी पोरे यांनी सांभाळली. अभिनेत्री उर्मिला कोठारे ही या सिनेमात प्रमुख भूमिकेत होती.आता 'मला आई व्हायचंय' या सुपरहिट मराठी सिनेमावर आधारित 'मिमी' हा बॉलिवुड सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 

 

Recommended

Loading...
Share