लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेकांसाठी ते प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आणि अभिनयाचं जणू विद्यापीठ होते. काही कलाकारांना तर दिलीप कुमार यांच्यासोबत काम करण्याचीही संधी मिळाली आहे. त्यापैकी एक म्हणजे तबस्सुम. बालकलाकार आणि निवेदिका म्हणून प्रसिद्ध असलेल्या तबस्सुम या दिलीप कुमार यांना त्या लहानपणापासून ओळखतात. पिपींगमूनने नुकताच तबस्सुम यांच्याशी संवाद साधला. यावेळी दिलीप कुमार यांच्या आठवणींना उजाळा देताना त्या भावुक झाल्या. प्रत्येक भूमिकेत ते परफेक्ट दिसत असल्याचं तबस्सुम सांगतात.
त्या सांगतात की, "मी त्यांना लहानपणापासून ओळखतेय. 1940 च्या दशकात मी त्यांच्यासोबत 'जौगन', 'दिदार' यासह पुढे अनेक सिनेमांमधून काम केलय. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने मी अत्यंत त्रासात आहे. मी चार ते पाच वर्षांची असल्यापासून ते मला ओळखत होते."
याशिवाय तबस्सुम यांनी सायरा बानो यांचही कौतुक केलं आहे. सायरा बानो या एक चांगल्या पत्नी सिद्ध झाल्याचं त्या म्हणाल्या.