नात्यांचा एक अनोखा गुंता लवकरच आपल्याला मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित 'मन फकीरा' सिनेमाच्या निमित्ताने अनुभवता येणार आहे. सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील आणि अंकीत मोहन हे कलाकार सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. आजच्या तरुणाईशी रिलेट होणारी गोष्ट सिनेमात पाहायाला मिळणार आहे. अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने दिग्दर्शित केलेल्या या पहिल्यावहिल्या सिनेमाच्या निमित्ताने पिपींगमून मराठीशी खास बातचित केली.
'मन फकीरा' सिनेमासाठी मृण्मयी प्रचंड उत्साही आहे. ती सांगते," माझ्या पहिल्याच सिनेमात मला जे सांगायचं होतं, जे विषय मांडायचे होते ते मांडण्याचं स्वातंत्र्य मिळालं. निर्मात्यांचा खुप सपोर्ट मिळाला आणखी काय हवंय एका दिग्दर्शकाला, मी खुप खुप आनंदी आहे."
पात्रांच्या निवडीबद्दल आणि लंडनच्या चित्रीकरणाबद्दल बोलताना मृण्मयी म्हणते,"सुव्रत सायली अंजली आणि अंकीतपेक्षा सिनेमातील पात्रं दुसरं कोणीच करु शकली नसती. सर्वांनीच उत्तम भूमिका साकारल्या आहेत. लंडनवर जरी हा सिनेमा चित्रित झाला असला तरी चकाचक लोकेशन्सऐवजी ह्या पात्रांच्या नजरेतून लंडन सफर प्रेक्षकांना घडेल."
बोलता बोलता मृण्मयी एक गोष्ट आवर्जून सांगते, ते म्हणजे " हा सिनेमा पाहताना तुम्हाला तुमच्या जिवलगाची आठवण येईल, तुम्हाला तुमच्या एक्सची आठवण येईल. हा सिनेमा पाहताना लाईफचा दर्द बोललो यार, असं वाटतं. तुम्हाला पण ती फिलींग नक्की येईल"
दिग्दर्शन मृण्मयीचं पहिलं प्रेम आहे आणि यानंतरही ती दिग्दर्शित करत असलेले आणखी सिनेमे रसिकांच्या भेटीला येत आहेत.