बिग बॉस मराठीच्या घरात तिस-या सीझनमध्ये सुरुवातीपासूनच हल्ला-बोल सुरु आहे. अनेक कारणांनी यंदाचा सीझन चर्चेत आहे. एकापेक्षा एक वरचढ असे स्पर्धक एकमेकांसमोर उभे येऊन ठाकले आहेत. यातच घरात जणू दोन गट तयार झाले आहेत. सध्या घरात हल्ला बोल हा टास्क खेळण्यात येत आहेत. प्रत्येकाला आपलं स्थान टिकवून ठेवायचं आहे.
या टास्कमध्ये घरातील सदस्य दोन गटात विभागले गेले. परंतु, हा टास्क करताना तृप्ती देसाई यांनी विशालच्या डोक्यावर अंडी फोडली आहेत. विशाल शाकाहारी असतानादेखील तृप्ती यांनी त्याच्या डोक्यावर अंडी फोडल्याने विशालचे चाहते नाराज झाले आहेत. खेळ खेळताना एखाद्याचा विचार केला जावा असं चाहत्यांचं म्हणणं आहे.
हल्ला बोल या टास्कमध्ये मोटार सायकलवर बसलेल्या एका गटातील सदस्यांना दुसऱ्या गटातील सदस्यांनी युक्ती लढवून उठवायचे आहे. तर मोटार सायकलवर बसलेल्या सदस्यांनी काहीही झालं तरी जास्तीत जास्त वेळ त्यावर बसून राहायचे आहे.
सुरुवातीला तृप्ती विशालला या संबंधी वारंवार सूचना देतात. तृप्ती म्हणतात, 'मला माहीत आहे विशाल तू शाकाहारी आहेस मला तुझ्या अंगावर अंडी फोडायची नाहीत. तू उठ.' परंतु, विशाल हार मानत नाही. विशाल मोटार सायकलवरून उठायला तयार होत नसल्याने अखेर तृप्ती त्याच्या डोक्यावर अंडी फोडतात.