आजही मराठी सिनेमा म्हटलं डोळ्यासमोर येतो तो लक्ष्या. त्याचं नाव लक्ष्मीकांत बेर्डे असं असलं तरी रसिकांना तो लक्ष्या म्हणूनच अधिक भावला. त्याचं विनोदाचं टाईमिंग, हावभाव आणि कमालीचा निरागस चेहरा प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून आहे.
लक्ष्याने मराठी सिनेमाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन पोहोचवलं. आजही ज्याच्या नसण्याची खंत कित्येक सिनेप्रेमींच्या मनात आहे, असा तो एकमेव 'लक्ष्मीकांत बेर्डे' म्हणजेच आपल्या सगळ्यांचा लाडका 'लक्ष्या'... दीड ते दोन दशकं सिनेसृष्टीत धुमाकूळ घालणार्या या विनोदाच्या बादशाहाची एक्झीट सिनेरसिकांसाठी शॉकिंग होती...
त्याच्या जाण्याने मराठी विनोदी सिनेमा पोरका झाला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मराठीतच नव्हे तर हिंदीतही आपल्या अभिनयाने आणि कामाने इतरांची मनं जिंकली होती. हिंदी सिनेमात त्याचा रोल नोकराचा असो किंवा हिरोच्या मित्राचा मुख्य व्यक्तिरेखेइतका भाव कोणी खाल्ला असेल तर त्याच्या व्यक्तिरेखेने.
लक्ष्याला जाऊन आज चौदा वर्षं पूर्ण झाली आहेत. तरीही तो गेलाय असं वाटतच नाही. त्याचे 'एकापेक्षा एक''चिकट नवरा' 'रंग प्रेमाचा', 'लपवा छपवी' 'इजा, बिजा, तिजा' आणि 'बजरंगाची कमाल हे चित्रपट आहेतच. याशिवाय ‘झपाटलेला’ ‘अशीही बनवा बनवी’, एक गाडी बाकी अनाडी, ‘पछाडलेला’ या चित्रपटांना प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. ‘धूमधडाका’ या चित्रपटातून मराठी चित्रपटविश्वात पाऊल ठेवलेल्या लक्ष्यानं मराठी सिनेसृष्टी गाजवली.
प्रिया अरुण ही त्यांची सिनेमातील नयिका होतीच, पण ख-या आयुष्यातही त्यांची नायिका होती. या जोडीने अनेक सुपरहिट सिनेमे दिले.
लक्ष्याचा वारसा पुढे नेण्यासाठी त्याचा मुलगा अभिनय सिद्ध झाला आहे. त्याने ‘ती सध्या काय करते’ या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. लक्ष्या आज भलेही आपल्यात नसला तरी त्याच्या अभिनयाने सदैव रसिकांच्या मनात आहे.