आपल्या विनोदी आणि खलनायिकी अभिनय शैलीमुळे सिनेसृष्टीत वेगळं स्थान निर्माण करणा-या अभिनेत्री म्हणजे सविता मालपेकर. रंगभूमी असो मालिका किंवा मग सिनेमे सर्वत्रच त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. काही महिन्यांपूर्वी शिवाजी पार्कवर मर्निंग वॉकसाठी गेलेल्या सविता यांची सोनसाखळी चोरट्यांनी लंपास केली होती. त्यानंतर सविता यांनी याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली होती. . पोलिसांनी तपास करुन आरोपीला अटक केली आणि सविता मालपेकर यांची 3 तोळ्यांची चैन परत दिली. पोलिसांनी चैन परत मिळवून दिल्यानं सविता मालपेकर यांनी आभार मानले आहेत.
महेश मांजरेकर दिग्दर्शित सुपरहिट सिनेमा काकस्पर्शमध्ये सविता मालपेकर यांनी आत्याबाईची भूमिका साकारली होती. यासाठी त्यांनी डोक्यावरचे सर्व केस कापले होते. त्यांची ही भूमिका विशेष लक्षवेधी ठरली.
‘कुंकू लावते माहेरचं’, ‘गड्या आपला गाव बरा’, ‘स्वामी पब्लिक लिमिटेड’, ‘नटसम्राट’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘शिकारी’, ‘मी शिवाजी पार्क’, ‘7 रोशन व्हिला’ अशा सिनेमात त्यांनी भूमिका केल्या आहेत. ‘हथियार’ या हिंदी चित्रपटातही त्या झळकल्या आहेत. सविता मालपेकर यांनी गेल्याच वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.