मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रातील जवळपास सर्वच माध्यमांमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनय कौशल्याने वेगळे स्थान निर्माण केलेले अभिनेते म्हणजे उदय टिकेकर. सद्ध्या स्टार प्लस वाहिनीवरील 'कसोटी जिंदगी की 2' या मालिकेत अनुराग बासूच्या वडिलांची म्हणजेच मोलोय बासूची भूमिका उदय टिकेकर साकारत आहेत.
लवकरच हि मालिका २०० एपिसोड चा टप्पा यशस्वीरित्या पुर्ण करणार असून सूत्रांच्या माहितीनुसार मोलोय बासू यांचे अपघाती निधन होऊन ही भूमिका अल्पावधीतच प्रेक्षकांचा निरोप घेणार होती. मोलोय बासू या भूमिकेची वाढती लोकप्रियता आणि उदय टिकेकर यांचे अभिनय कौशल्य पाहता ही भूमिका वाढवण्याचा निर्णय चॅनेल आणि मालिकेच्या निर्मात्यांनी घेतला.
मोलोय बासू ही भूमिका साकारत असताना उदय टिकेकरांच्या अभिनयाचे विविध पैलू प्रेक्षकांच्या पसंतीस पडले आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांनी त्यांना वेळोवेळी दाद ही दिली. आता या अपघातानंतर हे पात्र डोळ्यांच्या आणि चेहऱ्यांच्या हावभावाने व्यक्त होताना दिसत आहे आणि अशी आव्हानात्मक भूमिकाही उदय टिकेकर समर्थपणे साकारत आहेत. या भूमिकेमुळे मालिकेला कोणते नवीन वळण येणार यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.
यावर उदय टिकेकर म्हणतात की " मी प्रेक्षकांचा खूप खूप आभारी आहे तसेच अशाप्रकारचे कलरफुल कॅरेक्टर मला करायला मिळाल्याबद्दल मी स्टार प्लस, एकता कपूर, त्यांची संपूर्ण क्रियेटीव्ह टीम, दिगदर्शक आणि सहकलाकार यांचादेखील खूप आभारी आहे."