मराठी सिनेमांचा ट्रेलर लाँच किंवा मुहुर्त हा अनेकदा एखादी पत्रकार परिषद घेऊन पार पडत असतो. पण शाहरुख खान मराठी सिनेमाच्या ट्रेलर लाँचिंगला उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ असावी. विक्रम फडणीस दिग्दर्शित ‘स्माईल प्लीज’ या सिनेमाची सर्वत्र चर्चा आहेच. पण या सिनेमाच्या ट्रेलर लाँचची चर्चा मात्र अधिक आहे. याला कारण आहे शाहरुख खान.
विक्रमच्या विनंतीवरून शाहरुखने या सोहळ्यास उपस्थित राहण्याचं मान्य केलं. विशेष म्हणजे स्माईल प्लीजच्या शुटिंगच्या पहिल्या दिवशी देखील हृतिक रोशनची उपस्थिती लक्षणीय ठरली होती. यावेळी अनेक कलाकार या मुहुर्तसोहळ्यास उपस्थित राहिले होते.
फॅशन डिझायनर आणि आता दिग्दर्शक असलेल्या विक्रम यांचा हा दुसरा मराठी सिनेमा आहे. २०१७ साली 'हृदयांतर' या सिनेमातून त्यांनी दिग्दर्शक म्हणून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या सिनेमात हृतिक रोशन पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकला होता.
‘स्माईल प्लीज’ ही जगण्याचा नवा संदेश देणारा सिनेमा आहे. वाईट घटनांमुळे आयुष्य थांबत नसतं तर ते पुढं जगायचं असतं हा संदेश या सिनेमातून दिला आहे. या सिनेमात मुक्ता एक फॅशन फोटोग्राफर आहे.
ललित प्रभाकर एक मस्तमौला युवक आहे तर प्रसाद ओक एक काम प्रिय असलेला माणूस आहे. या तिघांना जोडून ठेवणारा धागा म्हणजे स्माईल प्लीज हा सिनेमा.
आदिती गोवित्रिकरचीही या सिनेमात खास भूमिका आहे. हा सिनेमा १९ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रमुख पाहुणा असलेल्या शाहरुखने या सिनेमाला खुप शुभेच्छा दिल्या आहेत. शाहरुखने कलाकार आणि संगीतकारांचंही कौतुक केलं.