सोनी मराठीवरील 'ह. म. बने तू. म. बने' मालिकांमध्ये सतत घरगुती गमतीजमती चालू असतात त्याचबरोबर मालिकेमध्ये दैनंदिन जीवनातले महत्वाचे विषयही हाताळले जातात. ताजे उदाहरण द्यायचे झाले तर मालिकेतील तुलीकाच्या राहून गेलेल्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेचे देता येईल. अनेकदा स्त्रियांचे लग्नानंतर घरातील व्यापामुळे शिक्षण अर्धवट सुटून जाते. पण सासरी घरून पाठींबा मिळाला तर अनेकजणी शिक्षण पूर्णपण करतात. तुलीकाचे पण तसेच काहीतरी आहे. पण तिच्या गोष्टीत एक ट्वीस्ट आहे.
तुलिका बी. ए. च्या शेवटच्या वर्षाला असताना मल्हार आणि तिने पळून जाऊन लग्न केलं. त्यामध्ये तिची शेवटची परीक्षा द्यायची राहून गेली. पण दोघांनी घरच्यांपासून हि गोष्ट लपवून ठेवली. त्यांनी घरी तुलिका ग्रॅज्युएट असल्याचं सांगून ठेवल्यामुळे त्यांची इतक्या वर्षांमध्ये खरं बोलायची हिम्मत नाही झाली. तरीही तुलीकाने दरवर्षी लपूनछपून, शेवटच्या दिवशी अभ्यास करून परीक्षा दिल्या. पण घरचे व्याप सांभाळत कसाबसा अभ्यास केल्यामुळे तिला पास होता आलं नाही.
अशातच आता तुलीकाच्या अक्षरशः परीक्षेची वेळ आली आहे. मल्हार तिचं हॉलतिकीट घेऊन आला आहे, कारण तिची बी. ए. ची परीक्षा सुरु होत आहे. आता तिला परीक्षेत पास तर व्हायचेच आहे, पण त्याआधीच हि गोष्ट घरी समजू नये अशी भीतीही तिला वाटत आहे. अशा विचित्र कात्रीत तुलिका अडकली आहे. यावेळेस तुलिका पास होऊ शकेल का? ती परीक्षा आणि घरच्यांना एकत्र कसं सांभाळेल? का हे सर्व व्हायच्या आधीच ती ग्रॅज्युएट नाहीये हे घरी समजून ती अडचणीत येईल...? जाणून घ्या ’ह. म. बने तू. म. बने’च्या पुढच्या भागात, रात्री १० वाजता फक्त सोनी मराठीवर.