नुकतीच यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यंदाच या पुरस्काराचं हे 67वं वर्ष आहे. केंद्राकडून नुकतीच या पुरस्काराच्या विजेत्यांची नावं घोषीत करण्यात आली आहेत. कोणत्या चित्रपटाचा आणि कलाकारांचा गौरव या पुरस्कारात होईल याची अनेकांना उत्सुकता होती.
दरवर्षी होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यात यंदाही मराठी चित्रपटांनी बाजी मारली आहे. स्पेशल मेन्शन पुरस्कारासाठी अभिजीत वारंग यांच्या 'पिकासो' चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट नुकताच अमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक मुख्य भूमिकेत आहे.
'बार्डो' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फिचर फिल्मचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. या चित्रपटात अभिनेता मकरंद देशपांडे आणि अभिनेत्री अंजली पाटील यांच्या मुख्य भूमिका आहेत.
'आंनदी गोपाळ' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सामाजीक चित्रपटाचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. याशिवाय कलादिग्दर्शन विभागातही या चित्रपटाला पुरस्कार घोषित झालाय. सुनिल निगवेकर आणि निलेश वाघ यांनी या चित्रपटाचं कलादिग्दर्शन केलं आहे. दिग्दर्शक समीर विद्वांस यांच्या या चित्रपटात अभिनेता ललीत प्रभाकर आणि भाग्यश्री मिलींद यांच्या मुख्य भूमिका आहेत.
तर 'त्रिज्या' या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट साउंड रेकॉर्डिंगसाठीचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. तर 'ताजमाल' या सिनेमाला नरगीस दत्त पुरस्कार घोषित करण्याता आला.
गायिका सावनी रविंद्रला 'बार्डो' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार घोषित करण्यात आलाय.
यासह 'लता भगवान कारे' या चित्रपटाचा विशेष उल्लेख विभागात पुरस्कार घोषित आहे.
तर 'खिसा' या चित्रपटाला नॉन फिचर फिल्ममधील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पण पुरस्कार घोषित करण्यात आलाय या लघुपटाचे दिग्दर्शन राज मोरे यांनी केले आहे.