By  
on  

पायाला दुखापत झालेली असतानाही या अभिनेत्याने पूर्ण केला नाटकाचा प्रयोग

अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने सोशल मिडीयावर एक आठवण शेयर केली आहे. ही आठवण आहे त्याच्या नाटकाच्या प्रयोगादरम्यान झालेल्या पायाच्या दुखापतीची. तू म्हणशील तसं या नाटकाच्या प्रयोगादरम्यान अभिनेता संकर्षणच्या पायाला दुखापत झाली होती. तसाच पाय घेऊन त्याने संपूर्ण प्रयोग केला होता. एक वर्षापूर्वीची ही आठवण संकर्षणने सोशल मिडीयावर शेयर केली आहे. 

"हि घटना १ वर्ष जुनी आहे .......” आठवण म्हणुन शेअर करतोय ..तारीख २० जाने. २०२०. वाशी चा प्रयोग. नाटक ओपन होऊन बरोब्बर महिना झाला होता. आमच्या नाटकामध्ये धावपळ थोडी जास्तं आहे.
माझं पात्रं अवखळ असल्यामुळे काही मुव्हमेंट्स आमचा दिग्दर्शक प्रसाद ओक दादा ने जरा fast दिल्या आहेत. त्यातली एक टेबलावर ऊडी मारायची मुव्हमेंट करतांना माझा पाय स्टेजवर मुरगळला आणि स्वत:ला सावरून मी उठे पर्यंतच; टेनीस चा बाॅल पायाच्या घोट्यात ठेवलाय की काय.. असं वाटावं इतका पाय सुजला. अगदी काही क्षणांत. तो प्रयोग तसाच थोडा लंगडत केला. रात्री पुण्यात आलो कारण, दुसरे दिवशी दुपार १२.३० आणि संध्याकाळ ५.३० असे दोन प्रयोग होते. मग मी रात्रीच १२.३० वा. संचेती हाॅस्पिटल ला गेलो. डाॅक्टरांनी X Ray काढला. हेअर लाईन क्रॅक, स्वेलींग , रेस्ट , आॅपरेट, प्लास्टर.. ह्या सगळ्या शब्दांचा वापर करुन ते भलं मोठं काहीतरी सांगत होते.. मी डायरेक्ट एवढंच विचारलं , उद्या दोन प्रयोग करता येतील असं काहीतरी सांगा. त्यांनी दिलेल्या गोळ्या घेऊन रात्री झोपलो आणि सकाळी पलंगाच्या खाली पायच ठेवता आला नाही. मला घाम फुटला. थिएटर ला जाण्याआधी परत गोळ्या घेतल्या..... आणि प्रयोग सुरु केला. त्या particular ऊडी च्या मुव्हमेंट ला जिथे मला काल लागलं होतं.. आज सगळे बॅकस्टेज आर्टिस्ट सुद्धा विंगेत येऊन थांबले होते. पण , दोन्ही प्रयोग सुरळीत आणि मस्तं झाले. नंतर काही दिवसांची gap होती. आराम केल्यावर सूज पण गेली आणि पाय दुखला पण नाही."

 

या दुखापतीदरम्यान संकर्षणचा पाय सुजला होता. तसं असतानाही त्याने प्रयोग पूर्ण केला होता. एक अभिनेता म्हणून एक चांगल उदाहरण संकर्षणने या घटनेतून समोर आणलं आहे. या दुखापतीचा परिणाम नाटकाच्या प्रयोगावर होऊ नये याची योग्य काळजी संकर्षणने घेतल्याने प्रयोग कुठेही न थांबता प्रेक्षकांचं मनोरंजन त्याने केलं. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive