माऊची आई फेम शर्वाणी पिल्लई करणार निर्मिती क्षेत्रात पदार्पण, या वेबसिरीजची करणार निर्मिती

By  
on  

 अनेक कलाकार आता दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रात उतरताना दिसत आहेत. यातच अभिनेत्री, लेखिका शर्वाणी पिल्लई आता निर्मित क्षेत्रात पदार्पण करत आहे. पॅलेट मोशन पिक्चर्स असं तिच्या या निर्मिती संस्थेचे नाव आहे. शर्वाणी आणि लेखक, दिग्दर्शक सुश्रुत भागवत या निर्मिती संस्थेचे निर्माते आहेत.

'वर्दे आणि सन्स' या आगामी वेबसिरची निर्मिती आता पॅलेट मोशन पिक्चर्स म्हणजेच शर्वाणी आणि सुश्रुत करणार आहेत. लोकेश गुप्ते या वेबसिरीजचं दिग्दर्शन करत असून अभिजीत खांडकेकर, उपेंद्र लिमये, रेशम श्रीवर्धन, दीपक करंजीकर हे कलाकार या वेबसिरीजमध्ये झळकणार आहेत. प्लॅनेट मराठीवर ही वेबसिरीज प्रदर्शित होणार आहे.

 याविषयी शर्वाणी सांगते की, "2014 साली प्रदर्शित झालेला सौ शशी देवधर हा मी आणि सुश्रुत भागवत ह्यानी एकत्र लिहिलेला पहिला सिनेमा. पुढे आम्ही दोघांनी एकत्र येऊन व. पु. काळे लिखित बदली ह्या कथेचा कथा विस्तार केला आणि सुश्रुतने दिग्दर्शक म्हणून पहिलं पाऊल उचललं. "अ पेइंग घोस्ट" प्रेक्षकांना आवडला. त्यानंतर एका नव्या विषयाची जुळणी चालू झाली. मधुकर रहाणे आणि रवी शिंगणे ह्यांनी निर्मिती केलेला, "असेही एकदा व्हावे" प्रेक्षकांनी तर उचलून धरलाच पण त्याच बरोबरीने ह्या चित्रपटासाठी राज्य पुरस्कार सोहळ्यात सात नामांकन आणि दोन पुरस्कार मिळाले. एक वेगळा विषय हाताळण्याची संधी निर्माते सुधीर कोलते ह्यांनी देऊ केली ती "8 दोन 75, फक्त इच्छाशक्ती हवी!" या चित्रपटाच्या निमित्ताने. सध्या ह्या चित्रपटाचे पोस्ट प्रोडक्शन चालू असून आता लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे."

'अवंतिका', 'आंबट गोड', 'स्वराज्य रक्षक संभाजी' या सारख्या मालिकेतील शर्वाणीने साकारलेल्या भूमिका प्रसिद्ध आहेत. सध्या सुरु असलेल्या 'मुलगी झाली हो' या मालिकेतील माऊची आई म्हणजेच उमाच्या भूमिकेत शर्वाणी दिसत आहे. शर्वाणीने नाटक, चित्रपट, मालिका या माध्यमातून अभिनेत्री आणि लेखक म्हणून काम केलं. आता निर्मिती क्षेत्रातही तिला यश मिळेल यात शंका नाही.

Recommended

Loading...
Share