प्रसिद्ध दिग्दर्शिका, निर्मात्या, लेखिका सुमित्रा भावे यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या असं अचानक जाणं मनाला चटका लावून जाणारं असल्याची भावना अनेकांनी सोशल मिडीयावर व्यक्त केली आहे.
अभिनेत्री नीना कुळकर्णी यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करून दु:ख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्या लिहीतात की, "जिन्दगी जिन्दाबाद, भैंस बराबर, नितळ, घो मला असला हवा.. सुमित्रा ताई तुमचं सिनेमॅटिक जिनीयस अनुभवायला मिळालेल्यां पैकी मी एक भाग्यवान. हळुवारपणे, साधेपणाने चित्रपट उलगडत जायचा चित्रीकरणादरम्यान.. मजा यायची तुमच्या शूटींग ला. 'छान दिसतय' हे तुमचं रशेझ बघितल्या नंतरचं वाक्य ! 'छान दिसतय'. तुम्ही लिहीलेल्या, दिग्दर्शित, निर्मित केलेल्या चित्रपटांची लघुपटांची यादी एवढी मोठी आणि भारी आहे..मेजवानीच. सुमित्राताई तुमचा अखेरचा चित्रपट, दिठी हा स्पिरीच्युऐलिटीचा अनोखा अनुभव.. चित्रपट पाहुन भारावून तुम्हाला फोन केला आणि तेव्हा आपल्या झालेल्या गप्पा मी ह्रदयात जपल्या आहेत."
अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनीही सोशल मिडीयावर पोस्ट करून दु:ख व्यक्त केलं आहे. त्या लिहीतात की, "दु:ख.. सुमित्रा भावे.. मी कायम तुम्हाला पाहत आले.. कायम आठवण येईल."
दिग्दर्शक रवी जाधव यांनीही सोशल मिडीयावर दु:ख व्यक्त केलं आहे. ते लिहीतात की, "आत्ताच सुमित्रा भावे ताई यांच्या दु:खद निधनाची बातमी कळली...सुमित्राताई ह्या चित्रपट दिग्दर्शनाचे विद्यापीठ होत्या. त्यांनी हाताळलेला प्रत्येक विषय हा धाडसी आणि सर्वसामान्य माणसांच्या जिवनाशी जगाचा परिचय करून देणारा होता.दोघी, दहावी फ, वास्तूपूरूष, देवराई, नितळ, एक कप चा, घो मला असला हवा, संहिता, कासव, अस्तू या सारख्या अप्रतिम चित्रपटांनी भारतीय तसेच जागतिक चित्रपट प्रेमींना मराठी चित्रपटांची आदरयुक्त दखल घ्यायला लावली.आम्हा सर्वांशी त्या अत्यंत आपूलकीने बोलायच्या, आमच्या चित्रपटातील त्यांना आवडणाऱ्या व नावडणाऱ्या गोष्टी सांगून त्या मार्गदर्शन करायच्या.आज त्यांच्या जाण्याने केवळ मराठीच नव्हे तर संपूर्ण भारतीय चित्रपट सृष्टीचे मोठे नूकसान झाले आहे.सूमित्राताई भावे यांना भावपूर्ण श्रद्धांजली"
यासह अनेक कलाकारांनी सुमित्रा भावे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांचे निकटवर्तीय, प्रशंसक आणि त्यांच्यासोबत काम केलेल्या कलाकारांवरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे.