अभिनेता योगेश सोहोनी याला मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. अपघाताचा बनाव करुन एका अज्ञात स्कॉर्पिओ कार चालकाने योगेशला लुटल्याचा प्रकार घडला आहे.शनिवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास उर्से टोलनाक्याजवळ हा प्रकार घडला आहे. या प्रकरणात योगेशने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत असलेल्या शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणात आता अज्ञात स्कॉर्पिओ चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी योगेश हा त्याच्या कारने मुंबईहून पुण्याला जात होता. त्यावेळी उर्से टोलनाक्याच्या पुढे काही अंतरावर असलेल्या सोमाटणे एक्झिटजवळ काळ्या काचेची पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी मागून आली. त्या गाडीतील चालकाने योगेशला हात दाखवून थांबवण्यासाठी सांगीतले. योगेशच्या गाडीने त्यांच्या गाडीचा अपघात झाला असून एकजण जखमी देखील असल्याचं त्या चालकाने योगेशला सांगीतलं. एवढच नाही तर पोलीस तक्रान नको यासाठी सव्वा लाख रुपयाची मागणी करून योगेशला धमकवण्यात आलं. त्यानंतर त्या अज्ञात इसमाने जबरदस्ती पन्नास हजार एटीएममधून काढण्यास योगेशला भाग पाडलं. पैसे घेऊन त्या स्कॉर्पिओ चालकाने तिथून धूम ठोकली.
तो चालक निघून गेल्यानंतर योगेशला त्याच्यावर संशय आला. म्हणूनच त्याने एक्सप्रेसवेवर झालेल्या अपघाताची माहिती घेतली, तर कोणताच अपघात झालं नसल्याचं त्याला कळलं. या प्रकरणात योगेसने आता पोलीस ठाण्यात चोरी आणि लुटमारीची तक्रार दाखल केली आहे. पोलीस आता या आरोपीचा शोध घेत आहेत.
योगेश हा सध्या 'मुलगी झाली हो' या लोकप्रिय मालिकेत काम करतोय. या मालिकेत तो शौनकची भूमिका साकारतोय.