अभिनेता योगेश सोहोनी याला काही दिवसांपूर्वी एका अज्ञात इसमाने 50 हजार रुपयांचा गंडा घातला होता. योगेश मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर प्रवास करत असताना त्याला एका इसमाने गाडीच्या अपघाताच खोटा आरोप करत ब्लॅकमेल करून त्याच्याकडून 50 हजार रुपये उकळले होते आणि तिथून तो इसम पसार झाला होता. योगेशला या सगळ्या प्रकारात संशल आला आणि त्यानंतर त्याने यांसदर्भात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. या प्रकरणात क्राईम ब्रांचने मोठी कामगिरी बजावली आहे.
याच इसमाला आता पिंपरी चिंचवड क्राईम ब्रांचने अटक केली आहे. म्हणूनच या प्रकरणाविषयीचा एक व्हिडीओ करून योगेशने सोशल मिडीयावर शेयर केला आहे. या व्हिडीओतून आणखी एक बाब समोर आली आहे ती म्हणजे योगेशला हिप्नोटाईज करण्यात आलं होतं. या व्यक्तिने योगेशला हिप्नोटाईज केले असल्याने त्याला काही करता न आल्याचं तो या व्हिडीओत सांगतोय.
तो म्हणतो की, "8 मे रोजी मी मुंबईतून पुण्यात जात असताना माझ्यासोबत एक विचित्र प्रकार घडला. मला हिप्नोटाईज केलं गेलं आणि दमदाटी करुन एका माणसाने माझ्याकडून 50 हजार रुपये उकळले. हिप्नोटाईज केल्यामुळे मी काहीही करु शकलो नाही. मी लगेचच एफआयआर दाखल केली. मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की दोन दिवसांपूर्वी ही केस क्राईम ब्रांचच्या हाती गेली. आणि क्राईम ब्रांचच्या लोकांनी त्या माणसाला काल रात्री शोधून काढलं. त्यांनी मला तातडीने फोन केला आणि मी घटनास्थळी पोहोचलो, त्या माणसाला आयडेन्टीफाय केलं आणि ती व्यक्ति आता पकडली गेली आहे."
या सगळ्यात ज्यांनी ज्यांनी योगेशला मदत केली ते पोलीस, नातेवाईक, चाहते, मिडीया या सगळ्यांचे त्याने आभार मानले आहेत. सध्या योगेश हा 'मुलगी झाली हो' या मालिकेत शौनकच्या भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय.