By  
on  

'जून' चित्रपटाचा संगीत नजराणा, चित्रपटातील 'बाबा' गाणं प्रदर्शित

'हिलिंग इज ब्युटीफूल' या भावस्पर्शी वाक्यातच सारं काही सामावलं आहे. आपल्या दुःखावर हळुवार कोणी फुंकर मारली तर सगळंच सुरळीत, सुंदर होऊन जातं. आयुष्याकडे पाहण्याची एक नवीन दिशा मिळते. अशाच काहीशा आशयावर आधारित 'जून' ही वेबफिल्म लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यातच 'जून'मधील चार सुमधुर गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. वेगवेगळ्या भावना व्यक्त करणाऱ्या या गाण्यांना निखिल महाजन आणि जितेंद्र जोशी यांनी शब्दबद्ध केले आहेत. तर आपल्या जादुई आवाजाने प्रेक्षकांना आपलंस करणाऱ्या गायिका शाल्मलीने या गाण्यांना संगीत दिले आहे. 'जून'च्या निमित्ताने गायिका शाल्मली खोलगडे संगीतकार म्हणून पदार्पण करतेय. तेव्हा प्लॅनेट मराठीच्या 'जून' मधील ही गाणी यंदा पावसाळ्यातील आल्हाददायी वातावरणाचा आनंद द्विगुणित करणार आहेत.

नुकतच या चित्रपटातील 'बाबा' हे गाणं प्रदर्शित करण्यात आलय. निखिल महाजन लिखित 'बाबा' या भावनिक गाण्याला शाल्मली, अभय जोधपूरकर यांचा आवाज लाभला असून 'बाबा' हे रिप्राईज गाणं आनंदी जोशीने गायले आहे. 'हा वारा' हे प्रेरणादायी गाणे शाल्मली आणि जितेंद्र जोशी यांनी गायले असून 'पार गेली' या आनंददायी गाण्याला असीम धनेश्वर आणि नेहा तावडे यांनी स्वरबद्ध केले आहे. तर या दोन्ही गाण्यांचे बोल जितेंद्र जोशी यांचे आहेत. या सर्व गाण्यांना शाल्मली हिने संगीत दिले आहे. पहिल्यांदाच संगीतकार म्हणून आपल्या समोर आलेली शाल्मली आपल्या या नवीन प्रवासाबद्दल सांगते, ''प्रेक्षकांची प्रतीक्षा अखेर संपली असून प्लॅनेट मराठी ओटीटीवर ‘जून’ लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. यात मी एका वेगळ्या भुमिकेतून तुमच्या भेटीला येणार आहे. आजपर्यंत मी अनेक गाणी गायली आणि माझ्या या गाण्यांवर श्रोत्यांनी भरभरून प्रेम केले. मला आशा आहे, की प्रेक्षक मला संगीतकार म्हणूनही स्वीकारतील. त्यामुळे माझ्या या नवीन प्रवासाबाबत मी खूपच उत्सुक आहे. मुळात मला नवनवीन प्रयोग करायला आवडतात. त्यामुळेच 'जून' या वेबफिल्मच्या माध्यमातून मी संगीतकार म्हणून प्रथमच तुमच्यासमोर येत आहे. या प्रवासात खरंतर मला अनेकांची साथ लाभली आहे. विशेषतः निखिल महाजन आणि जितेंद्र जोशी यांची. त्यांच्या सुरेल शब्दांनी या गाण्यांना चारचाँद लावले आहेत. एकंदर ही संपूर्ण टीमच अफलातून आहे. यात वेगवेगळ्या मूडमधील गाणी असून मला खात्री आहे, 'जून'ची गाणी श्रोत्यांच्या नक्कीच पसंतीस उतरतील.'' 

सुप्री मीडियाचे शार्दूल सिंग बायस, नेहा पेंडसे बायस आणि ब्लू ड्रॉप प्रा. लि. चे निखिल महाजन आणि पवन मालू यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 'जून' या चित्रपटात नेहा पेंडसे  बायस, सिद्धार्थ मेनन, किरण करमरकर, रेशम श्रीवर्धन, निलेश दिवेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive