By  
on  

पहिल्या दोन आठवड्यात 'झिम्मा'ने गाठला 6 कोटींचा टप्पा, टीमने केलं यशाचं सेलिब्रेशन

'झिम्मा' या मराठी चित्रपटाचे तब्बल दोन आठवड्यात शोज हाऊसफुल्ल सुरु आहेत. 'झिम्मा'चे पहिल्या आठवड्यात 325 शोज लागले, त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात 700 पेक्षा जास्त म्हणजेच दुप्पटीहून अधिक शोज लागले होते. विशेष म्हणजे 50 टक्के सीट्सची परवानगी असतानाही पहिल्या दोन आठवड्यांमध्ये या चित्रपटाने 5.83 कोटींचा टप्पा पार केला. लॉकडाऊननंतर सुपरहिट ठरलेला 'झिम्मा' हा पहिला मराठी चित्रपट आहे. चित्रपटाचे छायाचित्रण, पटकथा, संवाद, दिग्दर्शन, अभिनय या सगळ्याच गोष्टी उत्तम जमून आल्याने प्रेक्षकांनी या चित्रपटाला पसंती दिली.  

सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'झिम्मा'  चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिकनी केले असून हेमंत ढोमे दिग्दर्शित या चित्रपटाचे छायाचित्रीकरण संजय मेमाणे यांनी केले आहे. क्षिती जोग यांच्यासोबत स्वाती खोपकर, अजिंक्य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, सनी शाह हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

नुकतच या यशाचं सेलिब्रेशनही करण्यात आलय. यावेळी या चित्रपटाची टीम हजर होती. सोनाली कुलकर्णी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, हेमंत ढोमे यांच्यासह मनोरंजन विश्वातील इतर कलाकार मंडळी या यशाच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाली होती.

'झिम्मा'च्या या यशाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे सांगतो की, ''सर्वप्रथम झिम्मा सुपरहिट ठरवल्याबद्दल मी सर्व मराठी प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो. प्रेक्षक, मित्र मंडळी, मराठीतील दिग्गज सोशल मीडियाद्वारे, फोनवरून, मेसेजकरून झिम्माबद्दल भरभरून बोलत आहेत. मराठी प्रेक्षक नेहमीच मराठी चित्रपटांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. कोरोनाबद्दलची आपली भीती बाजूला सारून चित्रपटगृहांमध्ये येऊन तो सिनेमा पाहात आहे. 'झिम्मा'चे यश हे माझे एकट्याचे नसून अनेक मजबूत खांदे कशाचीही पर्वा न करता खंबीरपणे उभे होते, म्हणूनच हा झिम्माचा खेळ मांडता आला.''

Recommended

PeepingMoon Exclusive