By  
on  

१८ मे बुद्धपौर्णिमेपासून सुरु होतेय नवी मालिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरवगाथा

भारताच्या घटनेचे शिल्पकार आणि लोकशाहीचे त्राते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र हे इतिहासातलं एक महान पर्व आहे. इतिहासाचं हे सोनेरी पान पुन्हा उलगडलं जाणार आहे ‘स्टार प्रवाह’वर लवकरच सुरु होणाऱ्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ महामानवाची गौरवगाथा या मालिकेतून.  १८ मे म्हणजेच बुद्धपौर्णिमेपासून ही मालिका भेटीला येणार आहे. डॉ.  बाबासाहेब आंबेडकरांनी समता, बंधुता, लोकशाही, स्वातंत्र्य, जागतिक अर्थकारण व राजकारण यांविषयी मांडलेले विचार आजही समर्पक ठरतात. त्यांचे कार्य आजही तेवढेच परिणामकारक आणि स्फूर्तिदायी ठरते. महामानवाचे हेच विचार देशभरात पोहोचवण्याच्या हेतूने ‘स्टार प्रवाह’ने या मालिकेची निर्मिती केली आहे.

अभिनेता सागर देशमुख या मालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारणार आहे. सागरला याआधी वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांनी पाहिलंय. या भूमिकेविषयी सांगताना ते म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारणं माझ्यासाठी नवं आव्हान असणार आहे. बाबासाहेबांचं कर्तुत्व खरच महान आहे. या भूमिकेच्या निमित्ताने मला नव्याने आंबेडकर उलगडत आहेत. एक अभिनेता म्हणून मी श्रीमंत होतोय असं म्हण्टलं तर ते वावगं ठरणार नाही.’

सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. महामानवाचं हे महानकार्य मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न ‘स्टार प्रवाह’ वाहिनी करणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीने नेहमीच चाकोरीच्या बाहेरचा विचार करत नवनवे कार्यक्रम प्रेक्षकांसाठी सादर केले आहेत. म्हणूनच मराठी मनोरंजन क्षेत्रात स्टार प्रवाहची स्वतंत्र अशी ओळख आहे.

स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे या भव्यदिव्य मालिकेविषयी म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं गौरवशाली कार्य ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे. महामानवाचं हे महान कार्य मालिकेतून पोहोचवण्याचा प्रयत्न या मालिकेतून केला जाणार आहे. स्टार प्रवाहसाठी ही अभिमानाची गोष्ट तर आहेच शिवाय खूप मोठी जबाबदारी सुद्धा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं बालपण ते महामानवापर्यंतचा प्रवास मालिकेत पाहायला मिळणार आहे. टीव्ही हे अत्यंत प्रभावशील माध्यम असल्यामुळे प्रत्येक जनमानसात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार खोलवर रुजला जाईल यासाठी स्टार प्रवाहची संपूर्ण टीम प्रयत्नशील असेल.’

या मालिकेच्या शीर्षकगीतालाही उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतोय. आदर्श आणि उत्कर्ष शिंदेने या गाण्याचे शब्द लिहिले असून आदर्शच्या भारदस्त आवाजात हे गाणं रेकॉर्ड करण्यात आलंय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कर्ते सुधारक होते. सर्व माणसे समान आहेत, कोणीही उच्च किंवा नीच नाही अशी त्यांची ठाम धारणा होती. व्यवस्थेत शूद्र मानल्या गेलेल्या जातींवर होणारे अत्याचार याबाबत त्यांच्या मनात विलक्षण चीड होती. आपल्या प्रत्येक कृतीतून त्यांनी समानतेचे धडे दिले. अद्वितीय बुद्धिमत्ता, जागतिक दर्जाची विद्वत्ता, क्रांतिकार्य करण्याची प्रवृत्ती, संघटन कौशल्य, इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, प्रचंड वाचन आणि अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी लेखन... अशा अनेक गुणविशेषांसह ‘भीमजी रामजी आंबेडकर’ यांचा प्रवास हजारो वर्षांची गुलामगिरी नष्ट करणारे ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ इथपर्यंत झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हाच प्रेरणादायी जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न ‘स्टार प्रवाह’ वाहिनी करणार आहे. तेव्हा पाहायला विसरु नका ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ ही नवी मालिका १८ मे पासून रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive