आलिशान क्रूझवर पार पडली 'कोण होणार करोडपती'ची पत्रकार परिषद
'कोण होणार करोडपती'ची पत्रकार परिषद आंग्रीया क्रूझवर पार पडली. क्रूझवर पत्रकार परिषद होण्याची ही पहिलीच वेळ होती. या पत्रकार परिषदेला सोनी मराठीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एन. पी. सिंह, बिझनेस हेड अजय भाळवणकर, कोण होणार करोडपतीचे सूत्रसंचालक नागराज मंजुळे उपस्थित होते. हा कार्यक्रम किती महत्त्वाचा आणि हा कार्यक्रमाचा हेतू काय आहे हे रंगा गोडबोले आणि ए.व्ही.प्रफुलचंद्र यांनी प्रेक्षकांना सांगितलं.
'उत्तर शोधलं कि जगणं बदलतं' या पार्श्वभूमीवर आखला गेलेला हा शोमुळे प्रेक्षकांना आपलं नशीब बदलण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. तसेच जे हा कार्यक्रम टीव्हीवर पाहणार आहेत त्यांच्यासाठी घरबसल्या जिंकण्याची संधी मिळणार आहे. तसेच समाजासाठी झटणाऱ्या आणि कार्याने समाजात बदल घडवणाऱ्या कर्मवीरांना सुद्धा या कार्यक्रमात भेटता येणार आहे.
सोनी मराठीचे बिझनेस हेड अजय भाळवणकर याविषयी म्हणाले,'कोण होणार करोडपती? च्या या नव्या सीझनमध्ये आम्ही बऱ्याचशा नाविन्यपूर्ण गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आहे. अगदी सूत्रसंचालकाच्या निवडीपासून ते कर्मवीर या दर गुरूवारी सादर होणाऱ्या विशेष भागापर्यंत. ज्यात सामान्यांमध्ये राहून आपल्या कर्तृत्त्वाने समाजात सकारात्मक बदल घडवणाऱ्या काही कर्मवीरांना आम्ही सलाम करणार आहोत. त्याशिवाय या कार्यक्रमाच्यानिमित्ताने पहिल्यांदाच एक अभिनेता नाही तर दिग्दर्शक एखाद्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. नागराजमध्ये असणारा दिग्दर्शक समोर बसणाऱ्या प्रत्येकाची गोष्ट सुंदर पध्दतीने प्रेक्षकांसमोर मांडेल, याची आम्हाला खात्री आहे. त्यात सोनी मराठीवरून नागराजचं छोट्या पडद्यावर पदार्पण होत आहे, याचा आम्हाला आनंद आहे."
तसेच नागराज मंजुळे हे पहिल्यांदाच सूत्रसंचालकाच्या खुर्चीत बसणार आहेत. तसेच त्यांनी ए.व्ही. प्रफुलचंद्र यांच्याबरोबर आयुष्यात पहिल्यांदाच गाणं सुद्धा गायलं आहे. सूत्रसंचालकाच्या एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर येण्यासाठी आणि छोट्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी नागराज उत्सुक आहे.